सोलापूर - महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी हिप्परगा येथे तलावाची पाहणी केली. अतिवृष्टीमुळे हे तलाव तुडुंब भरले आहे. तलावाच्या सांडव्यातून शहरातील वस्त्यांत पाणी शिरण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना स्थानिक नगरसेवकांनी व सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
या वेळी माजी पालकमंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी, नगरसेवक संजय कोळी, नगरसेवक अविनाश पाटील, भाजपा संघटन सरचिटणीस बिजूअण्णा प्रधाने, मनपा अधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सोलापूर शहरात गेल्या आठ दिवसापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हिप्परगा तलाव हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. तसेच, अजून पुढे काही दिवस पाऊस येण्याची शक्यता असल्याने हिप्परगा तलावातील पाणी पातळी वाढू शकते. पाणी वाढल्यास सांडव्याच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील बाळे, शिवाजीनगर या भागात पाणी शिरण्याची शक्यता आहे.