सोलापूर: विठ्ठलाच्या दर्शनासाठी शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन येणाऱ्या तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना व्हीआयपी दर्शन देऊ, नये अशी मागणी हिंदुराष्ट्र सेनेने केली आहे. याबाबत हिंदुराष्ट्र सेनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. सोमवारी सकाळी हिंदूराष्ट्र सेनेच्या पदाधिकऱ्यानी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे.
वारकऱ्यांवर अन्याय : तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आषाढी एकादशीच्या पांडुरंगांच्या दर्शनासाठी पंढरपुरात येणार आहेत. केसीआर संपूर्ण मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल होणार आहेत. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतातील भाविक पंढरपूरात लाखोंच्या संख्येने येत असतात. वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. हजारो मैलांचा पायी प्रवास करत वारकरी पंढरपुरात दाखल होतात. अशा प्रसंगी तेलंगणाहून पंढरपुरात अख्या मंत्रिमंडळासह येणाऱ्या मुख्यमंत्री केसीआर यांना व्हीआयपी दर्शन देणे म्हणजे वारकऱ्यांवर अन्याय आहे.
खरे हक्कदार हे पायी प्रवास करणारे :पायी वारी करत येणारे वारकरीच व्हीआयपी दर्शनाचे खरे अधिकारी आहेत. केसीआर हे आषाढी एकादशीच्या आधी पंढरपुरात दर्शनास न येता वर्षभर यावेत, आमची काहीही हरकत नाही. परंतु भुवैकुंठ असलेल्या पंढरपुरात राजकीय शक्तिप्रदर्शनाच्या हेतूने येणार असतील तर वारकरी कदापि सहन करणार नाही अशी भूमिका हिंदुराष्ट्र सेनेचे शहर अध्यक्ष रवी गोने यांनी घेतली.