सोलापूर- खते आणि बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज कृषी विभागाला दिल्या. पालकमंत्रींच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामापूर्व आढावा बैठक पार पडली. व्हिडिओ कॅान्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीस जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर, जिल्हा उप निबंधक कुंदन भोळे, उपसंचालक रवींद्र माने, नाबार्डचे प्रदिप झिले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक किसन मोटे उपस्थित होते.
बैठकीच्या सुरूवातीला कृषी अधिक्षक बसवराज बिराजदार यांनी खरीप हंगामाचे नियोजन थोडक्यात स्पष्ट केले. पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने खते आणि बियाणांचा पुरवठा वेळेत व्हावा, वीज जोडण्या लवकर मिळाव्यात, शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी, वीज पुरवठा थ्री फेज दाबाने व्हावा, सरकारी आणि खासगी बँकांनी पीक कर्ज पतपुरवठाचे उद्दिष्ट साध्य करावे, अशा मागण्या केल्या. या मागण्यांवर सकारात्मक रीतीने निर्णय घेण्याची कार्यवाही सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या. त्याचबरोबर काही मागण्यांसाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.