सोलापूर - सांगोला तालुक्यातील चिंचोली येथील 'गोविंद मिल्क' ही दूध डेअरी सील करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नियमांची पायमल्ली होत असल्याने या डेअरीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - '... हे नव्या सरकारचे दुर्दैव,' फडणवीसांची पहिल्याच दिवशी टीका
या डेअरीमध्ये अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन होत असल्याची बाब समोर आली होती. अन्न व औषध प्रशासनाने सुचविलेल्या सुधारणा विहित कालावधीत पूर्ण न केल्यामुळे डेअरीचा परवाना एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता. निलंबन कालावधीत डेअरीने अन्न सुरक्षेसंबंधित सर्व सुधारणा करणे अपेक्षित होते. मात्र तरीही मानवी आरोग्यास अहितकारक आणि अस्वच्छ वातावरणात सदर डेअरी मनमानी पद्धतीने सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने ही डेअरी सील केली.
हेही वाचा - मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंसमोरील आव्हाने, तर 'या' आहेत त्यांच्या जमेच्या बाजू
सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. मंगेश लवटे आणि प्रशांत कुचेकर यांनी सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली. सर्व व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा कायद्याचे तंतोतंत पालन करूनच व्यवसाय करावा, अन्यथा अन्न व औषध प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख आणि सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिला आहे.