सोलापूर- व्याजाने घेतलेले पैसे दिले नाही, मुद्दल नाही, व्याज नाही म्हणून एका मित्राने आपल्या मित्राचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले आणि त्याला मारहाणही केली. पण, पोलिसांनी वेळीच दखल घेतल्याने विशाल पाटील याला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सोडविण्यात सदर बझार पोलिसांना यश आले आहे. अनिल राठोड या अपहरणकर्त्यावर गुन्हा दाखल झाला असून सध्या त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
माहिती देताना पोलीस निरीक्षक ऑर्केस्ट्रा बारमधील दोघे मित्र
विशाल पाटील (वय 30 वर्षे, रा. कुमठा नाका, सोलापूर) हा सोलापुरातील एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये गाणे गाण्याचे काम करत आहे. त्यासोबत अनिल रुपसिंग राठोड (वय 30 वर्षे, रा. हंचनाळ तांडा, जि विजयपूर, कर्नाटक) हा देखील ऑर्केस्ट्रा बारमध्ये कामास आहे. अनिल राठोडने काही दिवसांपूर्वी विशाल पाटील यास तीस हजार रुपये व्याजाने दिले होते. ते पैसे आणि व्याज विशालने अनिल राठोडला दिले नव्हते. त्याचा तगादा लावून अखेर अनिल राठोडने विशाल पाटीलचा 4 ऑगस्टला अपहरण केला.
टाळेबंदीमुळे थकले होते व्याज
विशाल पाटील हा दर महिन्याला अनिल राठोड यास 6 हजार रुपये व्याज देत होता. पण, टाळेबंदीमुळे दोघांचे काम बंद झाले होते. विशालकडे व्याज देण्यासाठी पैसे नव्हते तर अनिलला उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यामुळे अनिलने विशालकडे व्याज व मुद्दलयासाठी तगादा लावला होता.
चहा पिण्यासाठी बोलावून थेट विजापूरला नेले
अनिल राठोड हा 4 ऑगस्टला सोलापुरात आला आणि विशाल पाटीलला फोन करून शासकीय रुग्णालयाकडे चहा पिण्यासाठी बोलावून घेतले. व्याज आणि मुद्दल मागू लागला. त्यातच त्यांचा वाद सुरू झाला आणि विशालला चारचाकीत बसवून त्याला विजयपूर (कर्नाटक) कडे घेऊन गेला. गाडीतच विशालला मारहाण करत त्याला विजापूरकडे घेऊन गेले आणि त्याच्या पत्नीला फोन केला.
विशालच्या पत्नीला फोन करुन ठार मारण्याची धमकी
विशालच्या पत्नीला अपहरण करणाऱ्या संशयीत आरोपीने फोन करून तीस हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे दिले तरच त्याला सोडले जाईल अन्यथा त्याला ठार करण्यात येईल, असा फोन आला. पती घरी आले नाही आणि असा धमकीचा फोन आल्यामुळे विशालच्या पत्नीने सदर बझार पोलीस ठाणे गाठून आपली व्यथा मांडली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत शहानिशा केली आणि आरोपीचा शोध घेतला.
ऑनलाइन पैसे पाठवून लावला आरोपीचा छडा
विशाल पाटील यांची पत्नी पूजा पाटील यांना पोलिसांनी पैसे जमा झाले आहेत व पैसे ऑनलाइन पाठवते, असे उत्तर अपहरणकर्त्यांना देण्यास सांगितले. युपीआयच्या माध्यमातून अपहरणकर्त्या अनिल राठोडचा विजयपूरयेथील अचूक पत्ता कळाला. त्यानंतर सदर बझार पोलिसांचे पथक विजयपूर (कर्नाटक) येथे रवाना झाले. सहायक पोलीस आयुक्त अल्फाज शेख, हवालदार खाजप्पा आरेनवरू, दयानंद वाडीकर, गणेश कानडे आदींनी विजयपूर येथे गाठून अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळल्या. विशाल पाटील यांची सुखरूप सुटका केली.
हेही वाचा -सोलापूर स्मार्ट सिटीच्या कामाने घेतले दोन बळी, वाहनचालकांनाही कंबर-मणक्यांचे आजार