सोलापूर- रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हा विचार अंगीकारून एका रिक्षा चालकाने मोफत रुग्णसेवा सुरू केली आहे. यामुळे गोरगरिबांसाठी हा रिक्षावाला चाचा एक देवदूतच बनला आहे. तय्यब मुल्ला, असे रिक्षावाल्याचे नाव आहे. शहरातील जुना विडी घरकुल परिसरात या रिक्षावाल्याचे घर असून शहरातील कोणत्याही ठिकाणाहून कॉल आल्यास हे ते ताबडतोब रुग्णास घेण्यासाठी पोहोचतात आणि वेळेवर रुग्णास रुग्णालयात दाखल करतात. ही सेवा मोफत सुरू असून फक्त माणुसकी जपत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. तसेच या महामारीत माणसे सांभाळा आणि माणुसकी जपा असाही संदेश त्यांनी दिला.
रिक्षामधून रुग्णांना मोफत सेवा -
सोलापूरसह देशात कोरोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक जणांचे बळी गेले. कोरोनामुळे गरीब आणि श्रीमंत ही दरीच नाहीशी झाली आहे. कारण अनेक श्रीमंतांनादेखील दवाखान्यात बेड मिळताना दिसत नाही. खासगी रुग्णालये खचाखच भरली आहेत. अनेक श्रीमंत लोक गरीब लोकांच्या रांगेत जीव वाचवण्यासाठी येऊन थांबले आहेत. अशा कठीण प्रसंगी समाजाला आपलेही काही देणे लागते. या उद्देशाने गरीब असो किंवा श्रीमंत सर्व रुग्णांसाठी तय्यब मुल्ला यांनी मोफत सेवा सुरू केली आहे. शहरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर भयंकर असा ताण निर्माण झाला आहे. अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. या सर्व बाबींचा विचार करून तय्यब मुल्ला यांनी रुग्णांसाठी मोफत सेवा सुरू केली आहे. जवळपास 20 ते 25 जणांचे प्राण त्यांनी वाचविले आहेत. गंभीर परिस्थितीत असणाऱ्या या रुग्णांना त्यांनी वेळेवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.