सोलापूर- होटगी रोड येथे एफसीआय गोडऊनच्या बाजूला गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहे.
सोलापुरात गॅस सिलिंडरचा स्फोट, 4 जण गंभीर जखमी - सोलापूर
होटगी रोड येथे एफसीआय गोडऊनच्या बाजूला गॅस सिलिंडरचा स्फोट झाला आहे. यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
सोलापूर विमानतळाच्या समोर असलेल्या बसवेश्वर नगरमध्ये सकाळी साडेसहाच्या सुमारास हा गॅस स्फोट झाला आहे. सुरेश माने यांच्या घरी सकाळी आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी गॅसवर ठेवले होते. त्यातच सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे संपूर्ण घराचे मोठे नुकसान झाले आहे. गॅसचा स्फोट इतका मोठा होता की आजूबाजूच्या घराचे देखील यामध्ये नुकसान झाले आहे. याच्या स्फोटात सुरेश माने यांच्या कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर भारत गॅसचे अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्फोट घडलेल्या ठिकाणाची पाहणी केली.