सोलापूर- चोर समजून एका अज्ञात व्यक्तीला बांबूने मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना कुंभारी ते यत्नाळ रस्त्यावर असलेल्या शेतात घडली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात असून चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.
गेनसिध्द सिद्धप्पा माळी(वय 30 वर्षे), अण्णाराव सोमलिंग पाटील (वय 41 वर्षे), अमोगसिद्ध उर्फ योगेश भिमाप्पा आमसे (वय 35 वर्षे) व बाबाशा शिवप्पा बने (वय 24 वर्षे सर्व रा. कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कुंभारी ते यत्नाळ रस्त्यावर अण्णाराव पाटील यांचे शेत आहे. शेतात शेळीपालनाचाही व्यवसाय चालतो. मंगळवारी (दि.29 सप्टें.) रात्री पाउणे बाराच्या सुमारास हा अज्ञात तरुण आला. तेव्हा कुत्रे भुंकू लागल्याने पाटील यांना जाग आली मृत संशयित तरुण शेळी पळवून नेण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय पाटील यांना आला. त्यानंतर तेव्हा आरोपी गेनसिध्द माळी, अण्णाराव पाटील, अमोगसिद्ध आमसे व बाबाशा बने यांनी मृत तरुणाला पकडून लाकडी बांबू व काठीने बेदम मारहाण केली. त्यावेळी तरुण मी चोर नाही मी पुण्याहून आलो आहे, मला मारु नका, अशा विनवण्या हिंदीतून केल्या. मात्र, संशयितांनी केलेल्या मारहाणीमुळे तो तरण जागेवरच बेशुद्ध पडला.