महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश; करमाळ्यात आतापर्यंत घेतले तीन बळी - नरभक्षक बिबट्या लेटेस्ट न्यूज

मानव आणि वन्यप्राणी संघर्ष दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते आहे. यात प्रामुख्याने बिबट्या आणि मानव यांचा संघर्ष जास्त आहे. गेल्या पंधरा दिवसात एका नरभक्षक बिबट्याने अनेकांचा बळी घेत दहशत निर्माण केली आहे. या नरभक्षक बिबट्याला पकडणे शक्य न झाल्यास ठार मारण्याची परवानगी राज्याच्या वन विभागाने दिली आहे.

Leopard
बिबट्या

By

Published : Dec 7, 2020, 4:56 PM IST

सोलापूर - अहमदनगर, बीड आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात आठ दिवसापासून नरभक्षक बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याला ठार करण्याचे आदेश राज्याचे मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर यांनी वन विभागाला दिले आहेत. या बिबट्याने आपली दहावी शिकार करत चिखलठाणा येथील एका आठ वर्षाच्या मुलीचा बळी घेतला.

नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश मिळाले आहेत

गोदावरी खोऱ्यातून आलेल्या या नरभक्षक बिबट्याने अहमदनगर, बीड, सोलापूर जिल्ह्यात दहा जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या तिन्ही जिल्ह्यामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात बिबट्याचा वावर तूर, ऊस, गहू या पिकांमध्ये असल्यामुळे वनविभागाला नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यास अडचण निर्माण होत आहे. नरभक्षक बिबट्या तीन ते चार दिवसाआड मानवाला आपले भक्ष बनवत आहे. हा नरभक्षक बिबट्या मानवासाठी घातक बनत चालला आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करणे किंवा ठार मारणे आवश्यक झाले आहे.

बिबट्याला ठार मारण्यासाठी हे उपाय योजना

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने आतापर्यंत तीन जणांचा बळी घेतला आहे. तालुक्यातील उजनी काट भागात या बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. या भागात बिबट्या वावरत असताना त्याच्या पायाचे ठसे वन विभागाला मिळाले आहेत. मुख्य वनसंरक्षकांच्या सूचनेनुसार या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यापूर्वी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करण्यासाठी किंवा बेशुद्ध करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. बिबट्याला ठार केल्यानंतर कोणत्याही प्रकारचे इनाम स्वीकारले जाणार नसल्याची, माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

करमाळा तालुक्यात तीन बळी -

करमाळा तालुक्‍यात रायगाव जवळच्या फुंदे वस्तीवरील तरुण शेतकरी कल्याण फुंदे व दुसऱ्या दिवशी अंजनडोह येथील जयश्री शिंदे ही विवाहिता बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. चर चिखलठाणा येथील आठ वर्षाची मुलगी बिबट्याची तिसरी शिकार ठरली. त्यामुळे करमाळा तालुक्यात आतापर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे संपूर्ण करमाळा तालुक्‍यात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली आहे. शेतकरी, ग्रामस्थ यांना बिबट्यापासून कोणताही धोका होऊ नये म्हणून प्रशासनाकडून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मिळणार प्रत्येकी 15 लाखांची मदत -

नरभक्षक बिबट्या बीड-नगरमार्गे करमाळ्यात आला आहे. आता तो दक्षिणेकडे सात ते दहा किलोमीटरपर्यंत जावू शकतो, असे वन विभागाकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार संजय शिंदे यांच्या माध्यमातून वन विभाग व पोलीस प्रशासनातर्फे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने स्वतंत्र पथकांची नियुक्‍ती केली आहेत. परिसरात साधे कॅमेरे, सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. वन विभागाकडून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पंधरा लाखाची मदत मिळणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details