सोलापूर- जिल्ह्यासाठी वरदायनी असलेल्या उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी अक्कलकोट तालुक्यातील हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत आले नाही. मात्र, भीमा नदीतील या बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भीमा नदीकाठच्या दहा गावांनी केली आहे. तसेच या गावांच्या या मागणीचा विचार न केल्यास लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या गावकऱ्यांनी घेतला आहे.
पाणी सोडण्यासंदर्भात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्याचा काहीही फायदा न झाल्यामुळे संतप्त झालेल्या भीमा नदीकाठच्या गावांनी हा निर्णय घेतला आहे.
उजनीच्या पाण्यासाठी सोलापुरातील १० गावांचा निवडणुकांवर बहिष्कार जिल्ह्यात सध्या दुष्काळाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. पाणी टंचाईमुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नलल्यानैे अक्कलकोट तालुक्यातील भिमा नदी काठच्या तब्बल २२ गावांनी उजनी धरणातून पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा विभागाकडे केली होती. तसेच पाणी न सोडल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानंतर प्रशासनाच्या वतीने पाणी सोडण्याबाबत लेखी आश्वासन दिले होते. मात्र या लेखी आश्वासनानंतरही हिळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे भीमा नदीकाठच्या अक्कलकोट तालुक्यातील १० गावांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असून या दहा गावातील प्रमुख लोकांनी सोलापुरात येऊन पत्रकार परिषदेत बहिष्काराची माहिती दिली.
भीमा नदी काठावरील अक्कलकोट तालुक्यातील आळगी, शेगाव ,मुंडेवाडी, गुड्डेवाडी, अंकलगी, खानापूर, म्हैसलगी, धारसंग, आंदेवाडी, हिळी , देवी कवठा, कुडल, कोर्सेगाव या गावातील लोकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
दुष्काळ व नदीत पाणी सोडल्यामुळे भर उन्हाळ्यात शेतकऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कमी पर्जन्यमान झाल्याने तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे, तर जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळी परिस्थितीत सर्व प्रश्न मिटविण्यासाठी भीमा नदीतून हळ्ळी बंधाऱ्यापर्यंत पाण्याची गरज आहे आणि हे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. वास्तविक पाहता उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात आले आहे.
उजनी धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे सोलापूर शहरासाठी चिंचपूर आणि औज या दोन बंधाऱ्यात सोडण्यात आले आहे. मात्र, या बंधाऱ्याच्या खाली असलेल्या आणखी तीन बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, या शेतकऱ्यांना हे पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावातील संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीतील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. भीमा नदीकाठच्या दहा गावातील शेतकऱ्यांनी गावामध्ये ग्रामसभा घेऊन निवडणुकीवर सर्वानुमते बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.