सोलापूर- ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम न देणारे भाजप नेते कल्याण काळे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्याला दिल्याचे समोर आले आहे. पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विशाल चव्हाण या शेतकऱ्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन केला होता. या संभाषणाची 'ऑडिओ क्लिप' आता व्हायरल झाली आहे.
संवादामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट काळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. भाजप नेते कल्याण काळे यांचे पंढरपूर तालुक्यात सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि सीताराम महाराज खर्डी येथे खासगी, असे दोन साखर कारखाने आहेत. कारखान्या तर्फे २०१७-१८ आणि २०१८-१९ या दोन वर्षाची एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. तर, २०१९-२० या गाळप हंगामात दोन्ही कारखाने बंद होते. दोन वर्षे एफआरपीची रक्कम थकीत आहे, तर चालू हंगामात कारखाने सुरू होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. त्यामुळे, आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे.