सोलापूर - शहरातील शेतकऱ्याने नरोटेवाडी येथील शेतात जाऊन विष घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. अण्णासाहेब रामचंद्र भोसले-गवळी (वय 36) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची नरोटेवाडी येथे 5 एकर शेतजमीन आहे. लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे कंटाळून या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोलापूरात युवा शेतकऱ्याची आत्महत्या...विष पिऊन संपवले जीवन - solapur farmer suicide news
अण्णासाहेब रामचंद्र भोसले-गवळी (वय 36) असे आत्महत्या कलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.
अण्णासाहेब भोसले यांनी लॉकडाऊन सुरू होण्याअगोदर जानेवारी महिन्यात नरोटेवाडी येथील शेतात टरबूज लावले होते. तीन महिन्यानंतर हे पीक उगवेल आणि उन्हाळ्यात विकायला काढू, असा त्यांचा अंदाज होता. उन्हाळ्यात टरबूजला मागणी भरपूर असते. त्यामुळे या पिकापासून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा त्यांना होती. मात्र कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाले; आणि सर्व आशा धुळीस मिळाल्या. तसेच टरबूजही शेतातच खराब झाले.
यानंतर त्यांनी शेवग्याचे पीक लावले. पण निसर्गाने त्यावर घाला घातला. उत्तर सोलापूर तालुक्यात सप्टेंबरच्या सुरुवातीला अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेवग्याच्या पिकाचे खूप नुकसान झाले. अगोदर लॉकडाऊन मुळे झालेले नुकसान आणि नंतर अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान याला कंटाळून अण्णासाहेब भोसले यांनी 27 सप्टेंबर रोजी नरोटेवाडी येथील शेतात तणनाशक प्यायले. त्रास होऊ लागल्याने त्यांना खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले होते. परंतु बुधवारी 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी हताश झालेल्या या युवा शेतकऱ्याची उपचार सुरू असताना प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे दोन भाऊ, आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.