करमाळा(सोलापूर) - शहरात बनावटी खतांची विक्री करणाऱ्या टोळीचा कृषी विभागाने पर्दाफाशकेला. ही टोळी झुआरी केमिकल्स लिमिटेडच्या 'जय जवान' या ब्रँडची नक्कल करून बनावट पोटॅश खताची विक्री करत होती.
सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही अशाच पद्धतीने बनावट खताची विक्री झाली असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. यासंबंधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन याची व्याप्ती शोधण्याचे आव्हान आता कृषी व पोलीस विभागापुढे असणार आहे.
हेही वाचा -नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी ‘त्यांनी' साकारले शिवारघर
झुआरी केमिकल्स लिमिटेड गोवा या कंपनीच्या 'जय जवान' या ब्रँडमधून बनावट पोटॅश खताची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला मिळाली होती. या प्रकाराची खात्री करण्यासाठी जिल्हा गुणनियंत्रण तथा खत निरीक्षक अधिकारी सागर बारवकर यांनी झुआरी कंपनीच्या अधिकाऱ्यांसह गोयेगाव येथील अर्जुन गावडे या शेतकऱ्यांजवळील खताची तपासणी केली. तपासणीत हे खत बनावट असल्याचे आढळून आले.
करमाळ्यात बनावट खताची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश याबाबत कृषी विभागाने सखोल चौकशी केली असता मोहन सुतार (कोल्हापूर), अक्षय काशिद (माढा) व निलेश खानवटे (करमाळा) यांचा सहभाग असल्याची माहिती मिळाली. या टोळीने आतापर्यंत करमाळा तालुक्यात ६०० मेट्रीक टन बनावट पोटॅश खताची विक्री केल्याची माहिती समोर येत आहे. या तिघांवरही बारवकर यांच्या तक्रारीवरून करमाळा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.