पंढरपूर - 27 जानेवारी रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत झाली. त्यातच आता सोलापूर जिल्ह्यातील 758 ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडी आठ फेब्रुवारीला होणार आहेत. राज्यातील बहुसंख्य सरपंच पदाची निवड 10 फेब्रुवारीला पूर्ण होणार आहे. सरपंच पदाची निवड होण्यापूर्वी संबंधित गावांना तीन दिवसांची नोटीस दिली. जाणार आहे. तर चौथ्या दिवशी सरपंच पदी निवड सभा होणार आहे.. त्यादिवशी अर्ज भरणे, अर्ज माघारी घेणे व अंतिम निवड केली जाणार आहे.
सरपंच पदाच्या 8 फेब्रुवारीला निवडी
15 जानेवारीला सोलापूर जिल्ह्यातील 658 ग्रामपंचायतमध्ये निवडणूक पार पडली. 18 जानेवारी रोजी मतमोजणी करण्यात आली. मात्र, राज्य सरकारकडून 27 जानेवारी रोजी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. निवडणूक झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत गावचा कारभारी नेमण्याचा नियम आहे. त्यामुळे आता आठ फेब्रुवारीपर्यंत 658 ग्रामपंचायतींना गावचा कारभारी मिळणार आहे.
सरपंच पदावरून राजकारण तापले
पुढील दहा दिवस गावागावांमध्ये सरपंच पदावर चुरस निर्माण होणार आहे. त्यातच गावात वाद आणि तंटे होण्याची दाट शक्यता असते. काही गावांमध्ये नाराज असणाऱ्या सदस्यांना विरोधकांकडून सरपंच पदाची ऑफर देण्यात येत आहे. तर काही सदस्यांना आरक्षणामुळे सरपंचपदाची लॉटरी लागली आहे. यामुळे काहींचा ब्रह्मनिरास ही झाला आहे. मात्र गावातील जुनी व जाणते मंडळींना सोबत घेऊन काही पॅनल सरपंच व उपसरपंच असा मान देऊन मनधरणी करताना दिसत आहेत. त्यामुळे गावाचा कारभारी कोण याची उत्सुकता लागली आहे.