पंढरपूर -पाडव्याच्या मुहूर्तावर राज्य सरकारने राज्यातील प्रार्थनास्थळे भाविकांसाठी खुली केली होती. आठ महिने राज्यातील मंदिरे बंद असल्यामुळे मंदिरामध्ये देणग्यांमध्ये मोठी घट झाली होती. 16 नोव्हेंबरपासून पंढरपूर येथील विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्यापासून विठ्ठल मंदिर समितीच्या देणगीमध्ये वाढ होऊ लागली आहे. विठुरायाच्या चरणी भाविकांनी 74 लाखाचे दान अर्पण केले. ऑनलाइन आणि दानपेटीतील देणगी मिळून आजअखेर 74 लाख रुपयांचे दान जमा झाले असल्याची माहिती विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली.
विठ्ठलाच्या दरबारी भाविकांची गर्दी
विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरपासून विठुरायाचे मुखदर्शन सुरू झाल्याने देणगीमध्येही वाढ होऊ लागली आहे. लॉकडाउननंतर श्री विठ्ठलाचे द्वार मुखदर्शनासाठी खुले झाल्यानंतर आता पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळे आता उत्पन्नातदेखील समाधानकारक वाढ होऊ लागली आहे. पंढरपूर रोज हजारो भाविक दाखल होत आहेत. विठुरायाच्या मुखदर्शनाचा लाभ ऑनलाइन बुकिंग केलेल्या भाविकांना मिळताना दिसत आहे. मात्र ज्या भाविकांना मुखदर्शन घेता येत नाहीत, ते भाविक विठ्ठल मंदिराच्या कळसाचे किंवा नामदेव पायरीचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत. विठ्ठल मंदिर समितीकडून मुखदर्शन घेणाऱ्यांची संख्या 4, 800 करण्यात आली आहे. दोन महिन्यापासून 70 हजार भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.