महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी मोहोळच्या डॉ. सत्यजित म्हस्केसह तिघांना अटक - Solapur

पीसीपीएनडीटी कायदा 1994 (गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र अर्थात लिंग निवडीस प्रतिबंध कायदा) अन्वये गर्भलिंग निदान करण्यास शासनाने बंदी घातली आहे. मात्र, मोहोळ येथील डॉ. सत्यजित मस्के हे विहान हॉस्पिटल येथे बेकायदेशीरपणे गर्भलिंग करत होते.

डॉ. सत्यजित म्हस्केसह

By

Published : Mar 5, 2019, 8:33 PM IST

Updated : Mar 5, 2019, 10:35 PM IST

सोलापूर - पैशांसाठी गर्भलिंग निदान करणार्‍या डॉक्टरसह त्याच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मोहोळ शहरातील विहान रुग्णालयावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी मोहोळच्या डॉ. सत्यजित शिवाजीराव म्हस्के, आप्पा गणेश आदलिंगे, माया विकास अष्टुळ या तिघांना अटक करण्यात आली आहे.

डॉ. सत्यजित म्हस्के

सदर आरोपींवर गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्यानुसार मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहोळ न्यायालयाने त्यांना ६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. डॉ. सत्यजित मस्के विहान रुग्णालयात बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करीत असल्याची गोपनीय तक्रार जिल्हा ‘पीसीपीएनडीटी’ पथकाला प्राप्त झाली होती. त्यानंतर पथकाने सापळा रचून एका महिलेस डमी पेशंट म्हणून तर त्यांच्यासोबत अन्य एका महिलेस नातेवाईक म्हणून पाठवले.

यावेळी डॉक्टरांसाठी पेशंटचा शोध घेणारा रिक्षाचालक आप्पा गणेश आदलिंगे आणि आया म्हणून काम करणारी माया विकास अष्टुळ यांनी या दोघींना रिक्षातून विहान हॉस्पिटल येथे नेले. सोनोग्राफी तपासणीनंतर रुग्णाच्या पोटात पुरुष जातीचा गर्भ असून गर्भलिंग निदान करण्यासाठी १४ हजार रुपयांची मागणी डॉक्टरांनी केली. त्यापैकी डॉक्टरांना १३ हजार रुपये आणि माया अष्टुळ हिला १ हजार रुपये देण्याचे ठरले. यापैकी ८ हजार रुपये रोख रक्कम डॉ. म्हस्के यांनी स्वीकारली. याचवेळी या पथकाने डॉ. म्हस्के यांना रंगेहाथ पकडले. यावेळी माया अष्टुळ हिने गोंधळ घालून आत्महत्या करण्याची धमकी दिली. यानंतर मोहोळ पोलिसांनी हस्तक्षेप करून सर्वांना पोलीस ठाण्यात आणले. या पथकाने सुमारे ५ लाख १५ हजार रुपयांचे गर्भलिंग निदान करण्यासाठी वापरण्यात येणारे वैद्यकीय साहित्य जप्त केले आहे.

ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. पी. पी. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकातील अ‍ॅड. रामेश्‍वरी माने, पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ.जयश्री ढवळे, जिल्हा रुग्णालयाचे निवासी अधीक्षक डॉ. मोहन शेगर, कक्षसेवक हनीफ शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. त्यांना मोहोळ ग्रामीण रुग्णालय, पोलीस आणि तहसील प्रशासनाचे सहकार्य मिळाले.

Last Updated : Mar 5, 2019, 10:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details