सोलापूर - कोरोनाने एकाच कुटुंबातील तिघांवर आघात केला. शेतकऱ्यांसाठी कायम झगडणारे महामुद पटेल(वय ५८ वर्ष ) यांचे रविवारी कोरोनामुळे निधन झाले आहे. आठ दिवसांपूर्वी त्यांची पत्नी व जावई यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शेतकरी चळवळीतील नेता हरपल्याने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावरण आहे.
शेतकऱ्यांमध्ये दुःखाचे वातावण
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महामुद पटेल यांनी अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता. महामुद पटेल यांच्या निधनाची बातमी मिळताच सोलापूर येथील खाजगी रुग्णालयासमोर शेतकरी जमा झाले. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना घरी परत जावे लागले. दरम्यान, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पटेल यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्यात आले.
नुकताच जावई आणि पत्नीचा झाला होता मृत्यू
नुकताच इरफान पटेल यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या पत्नी लैलाबी पटेल यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे महामुद पटेल यांच्यावर एस संकट कोसळले होते. मात्र, आज पटेल यांचाही या कोरोनाने बळी घेतल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पटेल यांच्या निधनामुळे शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्ता गेला, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. पटेल दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट या गावचे रहिवासी होते.
आयुष्य शेतकऱ्यांसाठी लढले
महामुद पटेल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे कट्टर समर्थक होते. सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलन केली होती. शेतकऱ्यांच्या उसाला हमीभाव मिळवून देण्यासाठी अनेक कारखान्यांसमोर आंदोलन, उपोषण करुन शेतकर्यांना पटेल यांनी न्याय मिळवून दिला होता. माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर, तसेच धर्मराज काडादी यांच्या सिद्धेश्वर साखर कारखान्यासमोर महामूद पटेल यांचे झालेले आंदोलन राज्यभर चर्चेचा विषय झाले होते.
हेही वाचा -कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन उद्यापासून शिथिल; पालकमंत्र्यांची माहिती