पंढरपूर (सोलापूर) -बा विठ्ठला राज्यातील कोरोनाचे संकट दूर कर, कोरोनाची लस लवकर येऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विठ्ठलाचरणी घातले आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार यांसह मानाचे वारकरी भोयर दाम्पत्यांच्या हस्ते एकादशीनिमित्त पहाटे विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे व अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. तसेच राज्यातील गोरगरीब, बारा बलुतेदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच आषाढीनंतर कार्तिकी यात्रेला जी परंपरा आहे, ती यात्रा खंडित झाली आहे. वारकऱ्यांना वारीमध्ये येता आले नाही, त्यांनी घरामध्ये बंधने पाळून ही वारी केली. या दोन्ही वारीमध्येही मोठ्या प्रमाणात वाद होण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, अधिकारी व वारकरी संप्रदायातील काही सदस्यांच्या समंजस भूमिकेमुळे हा वाद टाळता आला. आषाढीवारी दरम्यान पंढरपूर नगर पालिका प्रशासनाला पाच कोटीचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, त्याची पूर्तता झाली नव्हती. मात्र, नगराध्यक्ष साधना भोसले यांच्याकडे हा धनादेश देण्यात आला अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
बळीराजाला संकटातून बाहेर काढ
राज्यातील शेतकरी कधी दुष्काळामुळे तर कधी अतिवृष्टीमुळे अडचणीत आला आहे. बळीराजाला या सर्व संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तसेच राज्यांमध्ये रस्त्यांची अवस्था बिकट झालेली आहे. त्यासाठी राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याचे बळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला द्यावे, अशी प्रार्थना विठ्ठल-रुक्मिणी मातेकडे अजित पवार यांनी केली.