सोलापूर - कुकडी प्रकल्पातून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत आहे. मात्र, हे वाहून जाणारे पाणी करमाळा तालुक्यातील सीना कोळेगाव धरणात सोडावे, नाहीतर तीव्र आंदोलन करू, असा इशारा करमाळा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सतीश नीळ यांनी दिला आहे.
सद्यपरिस्थितीत करमाळा तालुक्यात एकही मोठा पाऊस पडला नाही. त्यामुळे पूर्व भागातील शेतकरी अत्यंत मेटाकुटीला आलेला आहे. जनावरांना चारा नाही, पिण्याच्या पाण्याची सोय नाही. खरीप व रब्बीची पिके वाया गेले आहेत. अशा अनेक संकटांना तोंड देत जीवन जगणे अवघड झाले आहे. त्यामुळे कुकडी प्रकल्पाचे ओव्हरफ्लो वाहून जाणारे पाणी व दहिगाव उपसा सिंचन योजनेतून सीना कोळगाव धरणात सोडावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करणार, असा इशारा नीळ यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.