सोलापूर - जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातील पाण्याची पातळी मृत साठ्यापासून ५ पावलांवर आल्याने सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाईची चाहूल लागली आहे. धरणात सध्या फक्त ५.७० टक्के इतकाच उपयुक्त जलसाठा शिल्लक राहिला आहे. सध्या माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, कॅनॉल आणि बोगद्यातून पाणी सोडले जात असल्याने उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे पाणी कमी आणि मागणी जास्त असे चित्र निर्माण झाले.
उजनीची पाणीपातळी मृतसाठ्याच्या पाच पावलांवर...
पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. विहीर आणि विंधन विहिरी, बोअरवेल्सचे पाणी तळाला पोहचल्याने ३ महिने ही तीव्र पाणी टंचाई असणार आहे.
पावसाळ्यात सोलापूर जिल्ह्यात केवळ ३८ टक्के इतकाच पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. विहीर आणि विंधन विहिरी, बोअरवेल्सचे पाणी तळाला पोहचल्याने ३ महिने ही तीव्र पाणी टंचाई असणार आहे. भीमा नदीकाठच्या गावांना पाणी सोडावे लागणार आहे. याच दरम्यान आता सोलापूरला पाणीपुरवठा करणारा औज बंधारा कोरडा पडल्याने शहरासाठी पाणी सोडावे लागणार आहे. सध्या पंढरपूर शहराची पाणीकपात करण्यात झाली असून चारा पिके, फळबागा आणि ऊस क्षेत्र जगवण्यासाठी पाण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत आज पाणीपातळी ४९१ .४६ मीटरवर पोहचली असून १८८९ घनमीटर पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापैकी ८६दलघमी म्हणजे ३ .०६ टीएमसी उपयुक्त पाणी शिल्लक आहे.
पाण्याची मागणी आणि साठा याचा मेळ घालण्याचा प्रयत्न उजनी व्यवस्थापनाकडून केला जात आहे. त्यातच जस जसा उन्हाळा तीव्र होत जाईल तस तसे धरणातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होणार आहे. पर्यायाने पाणी पातळीत घट होणार असल्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करताना पाणीवाटपाचे काटेकोर नियोजन करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाने कळवले आहे.