सोलापूर - शहरातील अवैध धंदे कायमचे बंद करण्यात यावे, यासाठी माकपाने सह्यांची मोहीम हाती घेतली आहे. एक लाख सह्यांचे हे निवेदन राज्यपालांना व मुख्यमंत्री यांना देणार आहेत, अशी माहिती माजी आमदार नरसय्या आडम यांनी दिली.
सोलापुरात अवैध धंद्यांविरोधात माकपची एक लाख सह्यांची मोहीम गेल्या अनेक दिवसांपासून सोलापूर शहरात अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसानी या अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करत त्यांना जेरबंद केले पाहिजे, अशी मागणी यावेळी माकपा नेते आडम यांनी केली आहे. 'सावकारी, मटका बुकी, डान्सबार, हातभट्टी दारू, जुगार अड्डा, हे सर्व समाजाला लागलेले कर्करोग आहे. या रोगाचा कायमचा बंदोबस्त करावा,' असेही आडम म्हणाले.
शुक्रवारी (२ ऑक्टोबर २०२०) राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ व स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरातील अवैध धंद्यावर आळा घाला, युवकांना नौकरी अथवा बेरोजगार भत्ता द्या, मायक्रो फायनान्स व बचत गटाचे लॉकडाऊन काळातील हप्ते पूर्णपणे माफ करा, विषारी ताडी, मटका, खाजगी सावकारी, बारबाला, जुगार अड्डे बंद करा, ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे गरीब विद्यार्थ्यावर होणारा अन्याय दूर करा, नवीन शैक्षणिक धोरण मागे घ्या, अशा सर्व जनतेच्या न्याय हक्कांच्या मागण्या घेऊन एक लाख सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर युवा महासंघाचे जिल्हा सचिव अनिल वासम,विद्यार्थी संघटनेचे जिल्हा सचिव मल्लेशम कारमपुरी, बाळकृष्ण मल्याल, विजय हरसुरे, नगरसेवका कामिनी आडम, नलिनी कलबुर्गी, सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी उपस्थित होते.