सोलापूर- कोरोनामुळे मृत्युमूखी पडणाऱ्यांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूदर हा नऊ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 822 रुग्ण आढळले असून यातील 72 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापुरात मृतांचा आकडा अधिक आहे.
आता यापुढील काळात कोरोना संसर्ग रोखण्यासह मृत्यूदरावर नियंत्रण ठेवण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे़. देशात सर्वाधिक मृत्यूदर पश्चिम बंगाल या राज्यात असून तो 6.1 टक्के एवढा आहे. अशात राज्य, देश आणि जागतिक पातळीवरील मृत्यूदरात सोलापूरने आघाडी घेतल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे़. सोलापूरात गुरूवारी आणि शुक्रवारी सकाळी 100 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.