सोलापूर- हाथरस पीडितेच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासोबत उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने रेल्वे स्थानकाजवळील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसाचे सत्याग्रह आंदोलन झाले.
हाथरस घटनेच्या निषेधार्थ सोलापुरात शहर काँग्रेसचे एक दिवसीय सत्याग्रह आंदोलन - सोलापूर काँग्रेस बातमी
हाथरस येथील घटनेचा शिधेत करत तसेच राहुल गांधी, प्रियंका गांधी यांसह झालेल्या धक्काबुक्कीच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी संजय हेमगड्डी म्हणाले, उत्तर प्रदेशातील हाथरसच्या घटनेने देशाला शरमेने मान खाली घालायला लावली आहे. पण, भाजपच्या योगी आदित्यनाथ सरकारची थोडीही संवेदना जागी झाली नाही. हे प्रकरण अत्यंत बेजबाबदारपणे व हुकुमशाही पद्धतीने हाताळण्यात आले आहे. पीडित कुटुंबाला न्याय देण्याऐवजी त्यांना धमक्या देण्यापर्यंत उत्तर प्रदेश सरकारची मजल गेली आहे. पीडितेच्या पार्थिवाला परस्पर अग्नी देण्यात आला. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करत आहे. तसेच काँग्रेसचे खासदार राहुल गांधी व सरचिटणीस प्रियंका गांधी यांना हाथरसला जाताना अडवून धक्काबुक्की करण्यात आली. कार्यकर्त्यांवर लाठिमार करण्यात आला. पत्रकारांनाही पीडित कुटुंबियांना भेटायला दिले नाही. आरोपींना पाठीशी घालण्याचे काम योगी सरकार करत आहेत. बेटी बचाओचा नारा देणारे नरेंद्र मोदी आज मुग गिळून गप्प आहेत. उत्तर प्रदेश योगी सरकारच्या हुकूमशाही पद्धतीचा व दडपशाहीचा निषेध करत आहोत. भाजपचा हा सत्तेच माज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. आरोपींना ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे, असे मत संजय हेमगड्डी यांनी व्यक्त केले.
यावेळी महापालिकेचे गटनेते चेतन नरोटे, महिला काँग्रेसचे शहराध्यक्ष हेमा चिंचोलकर यांसह काँग्रेस पक्षातील नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा -बजाज फायनान्सची गुंडगिरी; थकीत कर्जदारास बेल्टने मारहाण