महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ashadhi Ekadashi 2023: बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, राज्य सुजलाम-सुफलाम होऊ दे- मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे - CM Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अखंड विठुनामाच्या गजरात पंढरपुरात शासकीय महापूजा पार पडली. बळीराजाला चांगले दिवस येऊ दे, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे,पाऊस पडू दे, राज्य सुजलाम, सुफलाम होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी -समाधानी होऊ दे. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आषाढी एकादशीच्या मुख्य शासकीय महापूजेवेळी विठूरायाच्या चरणी घातले.

Ashadhi Ekadashi 2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By

Published : Jun 29, 2023, 9:14 AM IST

Updated : Jun 29, 2023, 1:55 PM IST

सर्वांना सुखी कर हेच मागणे विठ्ठलाकडे- मुख्यमंत्री

पंढरपूर :आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सुविद्य पत्नी लता शिंदे तसेच मानाचे वारकरी दांपत्य भाऊसाहेब मोहिनीराज काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांच्यासोबत विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा केली. महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने आयोजित मानाच्या वारकऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत, ग्रामविकास व वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, बंदरे व खनीकर्म मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

मी सर्वसामान्यांचा कार्यकर्ता आहे. विठ्ठलाच्या कृपेने प्रामाणिक प्रयत्न करत आहे. विकासाचे काम आम्ही करत आहे. त्यामुळे त्या राजकारणावर मला काही वाटत नाही. आपण आपले काम करत रहायचे, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून ते असे बोलत आहेत.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना :आज आषाढी एकादशी आहे. आनंद, उत्साह आहे. मला पुन्हा एकदा विठ्ठलाची पूजा करता आली, मला चांगले वाटले असे मुख्यमंत्री म्हणाले. पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची गैरसोय होवू नये म्हणून आम्ही अनेक कामे केली. त्याचबरोबर शंभर बेडचे रुग्णालय, त्याचबरोबर एमआयडीसीसाठी सुद्धा सकारात्मक चर्चा केली. यावेळी राज्यातील बारा कोटी जनतेला पाच लाख रुपयेपर्यंत आरोग्य विमा राज्य सरकार काढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. बरोबर राज्यातील गरीब, बेरोजगार, शेतकरी, उद्योजक सर्वांना सुखीकर अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी विठ्ठलाकडे व्यक्त केली आहे.

निर्मल दिंडी पुरस्कार वितरण :वारीत सहभागी होणाऱ्या अनेक दिंड्या सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असतात. या दिंड्यांचा आदर्श घेऊन 'निर्मल वारी हरित वारी ' अभियानामध्ये नागरिकांचा सहभाग वाढवावा, या उद्देशाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती यांच्यामार्फत 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी' पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री तारकेश्वर गड दिंडी, ता. आष्टी, जि. बीड (एक लाख रुपये व सन्मानचिन्ह), द्वितीय क्रमांक नांदेडकर मंडळीची दिंडी, ता. हवेली, जि. पुणे (७५ हजार व सन्मान चिन्ह) तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक श्री एकनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था, यशवंतनगर, पैठण जिल्हा औरंगाबाद (५० हजार व सन्मान चिन्ह) या दिंडीला प्रदान करण्यात आले. यावेळी भूवैकुंठ या वारीसंदर्भातील छायाचित्र पुस्तकाचे प्रकाशन तसेच 'आरोग्यदूत' या पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री.औसेकर महाराज यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा :

  1. Ashadhi Wari 2023: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; नगर जिल्ह्यातील काळे दांपत्य ठरले मानाचे वारकरी
  2. Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशी, विठ्ठल नामाच्या जयघोषात पंढरीची वारी; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
  3. Ashadhi Ekadashi : आधी नंदापुरी मग पंढरपुरी; आषाढीसाठी कोल्हापूरातील प्रतिपंढरपूर नंदवाळ सज्ज
Last Updated : Jun 29, 2023, 1:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details