सोलापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूध दरवाढीचा निर्णय घेऊनच आषाढी पूजेला यावे, अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे. दुधाची दरवाढ न केल्यास विधानभवनावर मोर्चा काढण्यात येईल अशी, माहिती शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना दिली.
प्रतिलिटर 6 रुपये अनुदान द्यावे :राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रतिलिटर 6 रुपये अनुदान द्यावे. तसेच कर्नाटक, गुजरात राज्यांमध्ये दुधाला दिल्या जाणाऱ्या अनुदानाप्रमाणेच दूध धोरण राज्य सरकारने जाहीर करावे, अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास राज्यातील शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला आहे.
दूध संघाने दुधाचे दर कमी केले :महाराष्ट्रात दुधाचा व्यवसाय हा शेतीचा पुरक व्यवसाय म्हणून उदयास येत आहे. मात्र, लंम्पी रोग आणि कोरोना-१९ साथीच्या लॉकडाऊननंतर दूध व्यवसाय तेजीत असतानाच महाराष्ट्र दूध संघाने अचानक दुधाचे दर कमी केले. एकीकडे पशुखाद्य आणि पशुवैद्यकीय सेवांचे दर दुप्पट केले जात आहेत, तर दुसरीकडे दुधाचे प्रतिलिटर दर वाढण्याऐवजी कमी केले जात आहेत. याचे उत्तर राज्य सरकार, दूध संघाने शेतकऱ्यांना दिले पाहिजे. दुधाची मागणी वाढली असताना दूध संघ दुधाचे दर कमी करून नफेखोरी करत आहेत का? असा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. यावेळी गाईच्या दुधाला ४० तसेच म्हशीच्या दुधाला ६० रुपये भाववाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.