सोलापूर :सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सात रस्ता परिसरातील जनवात्सल्य या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. सोलापूर शहरात होणाऱ्या नाट्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदेना निमंत्रण देणार आहेत. चंद्रकांत पाटील हे काँग्रेच्या ज्येष्ठ नेत्याची भेट घेत असल्याने सोलापुरातील राजकीय वातावरणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.
ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अविनाश कुलकर्णींच मत :चंद्रकांत पाटील आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीवर सोलापुरातील विविध राजकीय विश्लेषक अंदाज व्यक्त करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे किंवा त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या नेहमी आरएसएस, एबीव्हीपीवर सडकून टीका करतात. भाजपा विरोधात आंदोलनात प्रणिती शिंदे सक्रिय असतात. म्हणून प्रणिती शिंदे किंवा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे भाजपामध्ये जाणार नाहीत. बुधवारी सकाळी चाय पे चर्चा करत सोलापुरातील मुख्य रस्त्यावर त्यांनी फेरफटका मारला. विविध लोकांशी संवाद साधत चर्चा केली. सोलापुरात काँग्रेसकडे आमदार प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदेंशिवाय पर्याय नाही. भाजपाला त्यांच्या विरोधात मजबूत उमेदवार द्यावा लागणार आहे. असं मत राजकीय विश्लेषक अविनाश कुलकर्णी यांनी व्यक्त केलं आहे.
शिंदेंच्या निवासस्थानी जनवात्सल्यवर राजकीय खलबते: सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी सोलापूर दौरा आहे. सायंकाळी पाचच्या सुमारास काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या निवासस्थानी ते जाणार आहेत. या भेटीमागील माहिती जाणून घेतली असता सोलापुरात होणाऱ्या शंभराव्या विभागीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पालकमंत्री पाटील हे सुशीलकुमार शिंदे यांना निमंत्रण देण्यासाठी जाणार आहेत. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे या नाट्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असून यापूर्वी सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात साहित्य संमेलन नाट्य संमेलन यशस्वी करून दाखवले आहे. त्यांचे योगदान पाहता आपण स्वतः त्यांच्या निवासस्थानी त्यांना निमंत्रण देण्यासाठी जाण्याचे नियोजन पालकमंत्र्यांनी केले असल्याचे समजले.