सांगोला (सोलापूर) -सर्वोच्च न्यायालयाने पाळीव प्राणी शर्यतीवर बंदी घातली असतानाही सांगोला तालुक्यातील कोळा येथे पाळीव श्वानांच्या शर्यतेची आयोजन करण्यात आले होते. आयोजकांना ही शर्यत चांगलीच महागात पडली आहे. याप्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली. या प्रकरणात चार दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेला महितीनुसार, प्राण्यांच्या शर्यती भरवण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असताना तसेच सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदीचे आदेश असतानाही कोळा (ता. सांगोला) हद्दीतील फॉरेस्टमधील मोकळ्या जागेत 10 सप्टेंबरला रोजी दुपारी लक्ष्मण कंराडे, सागर भाऊ करांडे, अजित शेदाळ यांनी श्वानांच्या शर्यतीचे आयोजन केले होते.
या प्रकरणी लक्ष्मण करांडे, समा जुनोनी, सागर करांडे, अजित शेवाळे, गणेश अशोक मोरे व उदय अरुण माने (सर्व रा. दानोळी, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर), प्रतीक देवेंद्र मरडे (रा. अंकली, ता. मिरज), ओंकार संजय भोसले (रा. आळते, ता. हातकणंगले), धनाजी जगन्नाथ पाटील व बजरंग तुळशीराम माने (दोघे रा. घाणंद), अनिल दल्याप्पा निळे व संजय मनोहर चौगुले (रा. जालिहाळ, ता. मंगळवेढा), सुनील पोपट चव्हाण व काशिलिंग हिंदुराव मंडले (दोघे रा. एखतपूर, ता. सांगोला), बाळासाहेब सोपान खांडेकर (रा. कोळा), दत्तात्रय बाळासाहेब वाघमोडे (रा. सावे) व सदाशिव मधुकर बिचुकले (रा. बामणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस शिपाई सुमित पिसे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन सांगोला पोलीस ठाण्यात भा.दं.वी.चे कलम 188, 270, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(3)/135, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897 चे कलम 2,3,4, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1969 चे कलम 11(1)(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा -'मराठा क्रांती'ची ठिणगी पडली..! सोलापुरात सरकार विरोधात तिरडी आंदोलन