सोलापूर - एकीकडे देशासह राज्यात धार्मिक तेढ वाढली जात असताना दुसरीकडे माढा तालुक्यातील सापटणे भोसे गावातील मुस्लिम कुटुंबातील दोन सख्या भावाची एकाच वेळेस भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. तौफिक शमिन काझी, तोहिद शमिन काझी अशी त्या दोघा भावाची नावे आहेत. विशेष म्हणजे वडील शमिन काझी यांची देखील भारतीय सैन्य दलात निवड झाली होती. मात्र, आई आजारी असल्याने शमिन काझी हे नाईलाजास्तव सैन्य दलात जाऊ शकले नाहीत. हीच वडिलांची भारत मातेच्या रक्षणाची स्वप्नपूर्ती तौफिक व तोहिदने पूर्ण करुन दाखवली आहे.
वडिलांचे अधुरे स्वप्न मुलांनी केले पूर्ण, भारतीय सैन्य दलात झाले दाखल - Bhose soldiers Village in Solapur district
सोलापूर जिल्ह्यातील भोसे गावातील मुस्लिम कुटुंबातील दोन सख्या भावांची एका वेळेस भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे. त्यांचे वडील शमिन काझी यांची देखील भारतीय सैन्य दलात निवड झाली होती. मात्र, आई आजारी असल्याने काझी सैन्य दलात जाऊ शकले नव्हते.
माढा तालुक्यातील सापटणे (भोसे) गावाला फौजीचे गाव म्हणुन संबोधले जाते. या दोघांबरोबरच या गावातील अगोदरच १५ हुन अधिक तरुण सैन्य दलात कार्यरत आहेत. तौफिक-तोहिद बरोबरच गावातील रोहित गायकवाड, निकेतन पाटील या दोघांची देखील निवड झाली आहे. वडील शमिन काझी यांची देखील सैन्य दलात निवड झाली होती, पंरतु त्यांना जाता आले नव्हते. हीच सल त्यांना सातत्याने जाणवत होती. आपल्या मुलांना भारतीय सैन्य दलात दाखल करायचेच असा निर्धार केला होता. त्यानुसार प्रयत्नांची पराकाष्ठा करत तौफिक अन् तौहिद यांनी वडिलांची स्वप्नपूर्ती करुन दाखवली.
माढ्याच्या रयत महाविद्यालयात शिक्षण घेत ३८ महाराष्ट्र बटालियन चे कमान्डिग ऑफिसर मनदिपसिंह व एनसीसी प्रमुख प्रा. नवनाथ लवटे यांचे मार्गदर्शन घेत स्वत:च्या प्रयत्न जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यशोशिखर गाठले. दोघा ही मुलांची भारतीय सैन्य दलात एकाच वेळी निवड होताच आई वडिलांना आभाळ ही ठेंगण वाटु लागले. देशाच्या सीमेवर प्रतिकुल परिस्थितीमध्ये कुटुंबापासून दुर राहुन शत्रुशी अहोरात्र लढण्यास दोघे सज्ज झाल्याने शमिन व जुलेखा या माता पित्याचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. फौजी चे गाव अशी ओळख असलेल्या सापटणे तील आणखी चौघे तरुण सैन्य दलात भरती झाल्याने सापटणे करांची मान अभिमानाने उंच झाली आहे, हे मात्र निश्चित.