महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नोकरीमागे न लागता, उस्मानाबादेतील तरुणाने सुरू केला फाटक्या नोटा बदलून देण्याचा व्यवसाय - shahabaz shaikh

उच्च शिक्षण घेऊनही सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये द्यायचे कुठून? या चिंतेत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने आगळावेगळा व्यवसाय सुरू करून बेरोजगारांसमोर एक आदर्श उभे करण्याचा काम केला आहे.

वैभव पाटील

By

Published : Jun 1, 2019, 10:18 AM IST

सोलापूर- उच्च शिक्षण घेऊनही सरकारी नोकरीसाठी लाखो रुपये द्यायचे कुठून? या चिंतेत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एका तरुणाने फाटक्या चलनी नोटा बदलून देण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. वैभव पाटील असे या तरुणाचे नाव आहे. यातून त्याला महिन्याकाठी २५ ते ३० हजार रुपये मिळत आहेत. वैभवच्या या आगळ्यावेगळ्या व्यवसायावर ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट.

ईटीव्ही भारतचा हा खास रिपोर्ट

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात असलेल्या वाकडी गावच्या वैभवचे शिक्षण बी.एस्सी., बी. एड.पर्यंत झाले आहे. नोकरीसाठी त्याने विविध संस्थांना भेटी दिल्या. त्या ठिकाणी नोकरीसाठी पंधरा ते वीस लाख रुपयांची मागणी संस्थाचालकांकडून होत होती. पण, इतके पैसे द्यायचे कोठून, असा प्रश्न त्याच्यासमोर उपस्थित झाला. वैभवकडे वडिलोपार्जित दहा एकर कोरडवाहू शेत जमीन आहे. पण, दुष्काळामुळे शेतीतून पुरेसे उत्पन्नही मिळत नव्हते. या सर्व प्रश्नांवर मार्ग शोधत वैभवने नाविन्यपूर्ण असलेला व्यवसायास सुरुवात केली. तो व्यवसाय म्हणजे चलनातील फाटक्‍या नोटा बदलून देण्याचा.


उंदराने कुरतडलेल्या, कपडे धुताना खिशात चुरगळलेल्या, अर्धवट जळालेल्या, रंग लागून खराब झालेल्या नोटांचे करायचे काय? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. मग ते लोक वैभवकडे येतात आणि फाटक्या नोटा बदलून घेतात. वैभव पाटीलही यासाठी काही सर्व्हिस चार्ज घेतात.

वास्तविक कोणत्याही बँकेत गेले तर फाटक्या नोटा किंवा रंगलेल्या नोटा या बदलून मिळतात. मात्र, ग्रामीण भागांमध्ये बँकांची संख्या कमी असते. अनेकांकडे बँकेत जाऊन नोटा बदलून घेण्यासाठी वेळ नसतो. या गोष्टींमुळे फाटक्या नोटा जवळ असलेले लोक वैभवकडूनच नोटा बदलून घेतात.


हा व्यवसाय करत असताना वैभव त्याच्या गावापासून सुमारे शंभर किलोमीटरच्या परिसरात असलेल्या मोठ्या आठवडी बाजारात जातो. आठवडी बाजारात फिरून फाटलेल्या नोटा बदलून देतो. हा व्यवसाय करत असताना व्यवसायाची जाहिरातही वैभवने कल्पकतेने केली आहे. डोक्यावरील टोपीवर आणि खिशातील पाटीवर फाटक्या नोटा बदलून मिळतील, अशी जाहिरात वैभव करतो. वैभवचे वडीलही हाच व्यवसाय करतात. वैभवचा हा नावीण्यपूर्ण व्यवसाय राज्यातील तरुणांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details