महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वाढीव वीजबिल : भाजपा, मनसेच्यावतीने आज राज्यभरात आंदोलन - bjp agitation increased electricity bill

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ऊर्जा मत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे.

bjp agitation in all maharashtra over Increased electricity bill
वाढीव वीज बिल : भाजपा, मनसेच्यावतीने आज राज्यभरात आंदोलन

By

Published : Nov 23, 2020, 6:30 AM IST

मुंबई - महावितरणने लॉकडाऊन काळात पाठवलेली चुकीची बिले माफ करण्यास नकार दिल्याने, भारतीय जनता पार्टीतर्फे आज (सोमवारी) महाआघाडी सरकारच्या विरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक ठिकाणी आंदोलनात पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. तर यासोबतच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फेही आज सर्व जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करणार असल्याची माहिती मनसेच्या वतीने देण्यात आली आहे.

सरकारला सत्तेच्या धुंदीतून जागे करण्यासाठी बिलांची होळी

लॉकडाऊनच्या काळात राज्यातील नागरिकांना भरमसाठ वीजबिले पाठवली गेली. याबाबत सवलत देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले होते. पण ऊर्जा मत्र्यांनीच स्वतः वीज बिलाबाबत दिलासा देता येणार नाही व नागरिकांना ती भरावी लागतील, असे स्पष्ट सांगितले आहे. तसेच या भरमसाठ बिलांची वसुली करण्याचेही जाहीर केले आहे. आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे, असे आरोप भाजपाकडून करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारने अर्थसाह्य करायला हवे होते

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. परिणामी नागरिकांना फार मोठा आर्थिक ताण सहन करावा लागला. अशा परिस्थितीत राज्यातील आघाडी सरकारने इतर राज्यांप्रमाणे श्रमिक, फेरीवाले, बारा बलुतेदार, शेतकरी, रिक्षाचालक, टॅक्सीचालक या वर्गाला अर्थसाह्य करायला हवे होते. तसे न करता भरमसाठ वीज बिले पाठवण्यात आली. सरकारच्या या मनमानी विरोधात भाजपाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. ठिकठिकाणी भाजपाचे कार्यकर्ते सोमवारी वीज बिलांची होळी करतील, अशी माहिती भाजपाचे प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी दिली.

वीज बिलाच्या मुद्द्यावरून मनसेही आक्रमक

वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर मनसेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेकडून आज राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढणार येणार आहे, अशी माहिती माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. वीज दरात सवलत देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र, ते पाळले गेले नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत आहे, असे बाळा नांदगावकर म्हणाले आहेत. तर सोमवारी सरकारला शॉक देणार, असे पोस्टर मनसेकडून दादर परिसरात लावण्यात आले आहे.

मनसेच्यावतीने लावण्यात आलेले फलक.

हेही वाचा -वीज ग्राहक हा आमचा देव आहे आम्ही त्याचे नुकसान करणार नाही

ABOUT THE AUTHOR

...view details