मोहोळ (सोलापूर)- भारतीय जनता पार्टी, रयत क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे महादेवाला दुधाचा अभिषेक घालून व मोफत दूध वाटप करून दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले.
मोहोळ तालुक्यातील वाघोलीत दूध वाटप करत भाजपाचे आंदोलन - सोलापूर भाजप बातमी
दुधाला भाव व दूध भूकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान सरकारने द्यावे, या मागणीसाठी मोहोळ तालुक्यातील वाघोली येथे आंदोलन करण्यात आले.
दुधाचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊ दे, असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालून उपसरपंच शेखर चोरमुले व भाजप नेते विकास वाघमारे यांच्या नेतृत्वात या आंदोलनाला सुरुवात झाली. महाविकास आघाडीचा निषेध व्यक्त करत दुधाची नासाडी न करता गरजूंना दूध वाटून आंदोलन संपन्न झाले.
दुधाला प्रतिलिटर 10 रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावे व दूध भूकटीला प्रतिकिलो 50 रुपये अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली. येणाऱ्या काळात तातडीने सरकारने दुधाला भाव वाढवून दिला नाहीतर आंदोलनाचे मोठे पाऊल उचलणार असल्याचा इशारा भाजपा नेते विकास वाघमारे यांनी यावेळी दिला.
यावेळी उपसरपंच शेखर चोरमुले, सिद्धेश्वर पवार, अनिल गावडे, भीमराव वाघमारे, नवनाथ वाघमारे, बजरंग माणके, नामदेव वाघमारे, नितीन पाटील आदी शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.