सोलापूर- कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सोलापुरातील बालाजी उद्योगसमूहाने 85 लाख रुपयांची मदत आज जाहीर केली. यापैकी मुख्यमंत्री सहायता निधीस 50 लाख, पीएम केअर्स निधीला 25 लाख तर तेलंगणा राज्य शासनाला 10 लाख रुपयांची मदत आज जाहीर केली. मदतीचा धनादेश बालाजी उद्योग समूहाचे संचालक राम रेड्डी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केला आहे.
बालाजी उद्योग समुहाचे प्रमुख राम रेड्डी आणि एन. राजेश्वर रेड्डी यांनी आज पन्नास आणि पंचवीस लाख रुपयांचे धनादेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपुर्द केले. तेलंगणा शासनाला ऑनलाईन पैसे पाठवण्यात आल्याचे, रेड्डी यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.