पंढरपूर (सोलापूर) -मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने तालुक्यातील ऊस उत्पादकांना चालु हंगामातील एफआरपी अधिक 14 टक्के दरवाढ जाहीर करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकऱ्यांसह चार दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन अधिक तीव्र होत असल्यामुळे शुक्रवारी (दि. 18 डिसें.) रात्री अज्ञात व्यक्तीने तलवार दाखवून आंदोलनकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील स्वाभिमानी कार्यकर्ते घटनास्थळी दाखल होत आहेत.
याबाबतची तक्रारदार दत्तात्रय लक्ष्मण पाटील (रा. मरवडे) यांनी यांनी दिलेली माहिती अशी की, दामाजी साखर कारखान्याने या नियमाचे पालन केले नाही म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राहुल घुले, श्रीमंत केदार व राजेंद्र रणे यांच्यासह दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी गेल्या चार दिवसांपासून कारखान्याच्या प्रवेशद्वारावर आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी रात्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना चौकातून लाल रंगाच्या दुचाकीवर दोन अज्ञात व्यक्ती आले. यापैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने (अंदाजे वय 40 वर्षे) आमच्याकडे बघत तलवार दाखवत गर्भीत इशारा दिला व पळ काढला. आंदोलनस्थळी तैनात असलेल्या दोन होमगार्डने त्यांचा पाठलाग केला. मात्र, ते निसटले.
पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणी
16 डिसेंबरपासून संत दामाजी सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. अशाप्रकारे जर कार्यकर्त्यांचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प राहणार नाही, असा इशारा घुले यांनी दिला आहे. तसेच आंदोलनस्थळी शस्त्रधारी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत सनदशीर पद्धतीने सुरू असलेले आंदोलन माघार घेणार नसल्याचे ॲड. राहुल घुले यांनी सांगितले.