पंढरपूर (सोलापूर) :पंढरपूरमध्ये आज मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आषाढी एकादशीच्या सोहळा संपन्न होत आहे. भाऊसाहेब मोहनीराज काळे (वय 56) व मंगल भाऊसाहेब काळे (वय 52) मु. पो.वाकडी, ता.नेवासा, जि. अहमदनगर यांना मंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर विठ्ठलाची महापूजा करण्याचा मान मिळाला. शेतकरी कुटुंबातील काळे दाम्पत्य हे मागील 25 वर्षापासून भास्कर गिरी महाराज यांच्यासोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करत आहेत.
उपस्थित अधिकारी :शासकीय महापूजा वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय, यांच्यासह ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कामगार मंत्री सुरेश खाडे, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत, कृषिमंत्री दादा भुसे, खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
विठुरायाची नगरी दुमदुमली : विठ्ठल नामाच्या जयघोषाने विठुरायाची नगरी दुमदुमली आहे. पंढरपूर मध्ये आषाढी एकादशीनिमित्त मोठी गर्दी झाली आहे. दहा ते बारा लाख भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आषाढी एकादशी निमित्त भीमा नदीमध्ये पाणी सोडल्याने चंद्रभागेमध्ये स्नान करून भाविक नामदेव पायरीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत.
वारकऱ्यांची विशेष काळजी : यंदा आषाढी वारीच्या निमित्ताने आरोग्य विभागाच्या वतीने वारकऱ्यांची विशेष काळजी घेतल्याचे दिसून येत आहे. आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी हा उपक्रम राबवत महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व वारकऱ्यांसाठी मोफत तपासणी औषधोपचार करण्याची सोय केली आहे. पंढरपूरमध्ये वाखरी पालखीतळ, 65 एकर जवळील तीन रस्ता व गोपाळपूर येथील दर्शनरांगे जवळील विष्णुपद येथे आपले दवाखाने उभे केले आहे. यामध्ये हजारो भाविकांवरती मोफत उपचार करण्यात आले आहेत.
हेही वाचा :
- Ashadhi Wari 2023 : विठुनामाच्या गजराने दुमदुमली पंढरी, मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारे शासकीय महापूजा
- Eknath Shinde On Ashadhi Ekadashi : आषाढीच्या महापूजेचा मान मिळाला हे माझे भाग्य - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- Ashadhi wari 2023 : केसीआर केवळ देवदर्शनासाठी आले होते; वारकऱ्यांची गैरसोय होऊ देणार नाही - पालकमंत्री विखे पाटील