सोलापूर- महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या संघटीत कार्याचे अर्धवयू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज २० ऑगस्ट २०१९ रोजी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, त्यांच्या हत्या प्रकरणात सरकारकडून अजूनही अपेक्षित तपास झाला नाही. त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आज बार्शीत मोर्चा काढून जवाब दो सूत्रधार कौन? असा प्रश्न विचारला आहे. यावेळी महाविद्यालयीन तरुणांनी संपूर्ण बार्शी शहरातून मोर्चा काढला.
'जबाब दो सुत्रधार कौन ?'अनिसचा बार्शीत मोर्च्याद्वारे सरकारला सवाल दाभोलकरांप्रमाणे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला देखील साडे चार वर्ष पूर्ण होत आहेत. तिच स्थिती प्रा.डॉ.एम.एम.कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची देखील आहे. या हत्यांच्या मालिकेमागे षडयंत्र आखून नियोजनबध्द कार्यवाही करायला प्रवृत्त करणारे सनातन संस्था व हिंदू जन जागरण समितीचे साधक होते, असे सरकारच्या आरोपपत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. मात्र, तरी देखील या हत्यांच्या तपासात दिरंगाई होत आहे. याला राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे.
त्याचबरोबर या हत्यांच्या तपासात समोर आलेल्या साक्षी पुराव्यांच्या बळकटीसाठी आवश्यक सर्व फरार गुन्हेगारांची अटक, तसेच त्यामागील संस्थापक व सूत्रधारांपर्यंत जाण्यात तपास यंत्रणांना अपयश आले आहे. मारेकऱ्यांच्या विरोधात आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस, तपास यंत्रणांकडून बक्षीस आणि तसेच त्यांचे छायाचित्रे देखील जाहीर करण्यात आली होती. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यामुळे मोर्चाकर्त्यांनी आज घोषणाबाजी करित राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे.
'जवाब दो सूत्रधार कौन?' अशी सोशल मिडीयावर मोहीम राबविण्यात येणार
या हत्यांचे सूत्रधार हे राष्ट्राच्या, संवैधानिक मूल्यविचार व लोकशाही कार्यपद्धतीच्या, प्रशासकीय यंत्रणेच्या, धर्मनिरपेक्ष शांततामय सहजीवनाच्या विरोधात अनेक वर्षांपासून जाहीरपणे लिखाण, प्रचार आणि प्रसार करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोह, संविधान विरोधी म्हणून 'इसिस' च्या धर्तीवर कारवाई केली जावी, अशी मागणी मोर्चाकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तसेच महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि समविचारी पक्ष, संघटना, संस्था, व्यक्ती यांच्या सहभागाने २० ते ३१ ऑगस्ट २०१९ दरम्यान 'जवाब दो सूत्रधार कौन?' अशी सोशल मिडीयावर मोहीम राबविण्यात येत आहे.