पंढरपूर -सध्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणुकीची रणधुमाळी जोरात चालू झाली आहे. त्यातच महा विकास आघाडीकडून राष्ट्रवादीकडे ही जागा आहे तर भाजपा ही जागा लढवणार आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत चाचपणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेश अध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्यातून उमेदवारी बाबत चर्चा करून कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी हा दौरा असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी...
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे अकाली मृत्यूमुळे रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भारत नाना भालके यांची या मतदारसंघावर एकहाती वर्चस्व होते मात्र त्यांच्या निधनानंतर मतदारसंघांमध्ये दोन गट राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहे. भारत नाना यांचे सुपुत्र भगीरथ भालके किंवा त्यांची पत्नी जयश्रीताई भालके यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र सध्या विठ्ठल साखर कारखान्यावर चेअरमन भगीरथ भालके यांच्याविरोधात संचालक युवराज पाटील यांनी दंड थोपटले आहेत. पंढरपूर राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष पदावरून राष्ट्रवादीत मोठे घामासान झाले होते. युवराज पाटील यांनी थेट भगीरथ भालके यांच्या उमेदवारीला चॅलेंज दिले होते. मात्र 23 मार्च रोजी पोटनिवडणूकीचा अर्ज भरणीला सुरुवात होणार आहे. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडाळी दिसून येत आहे.
अजित पवार व जयंत पाटील यांच्यासमोर कार्यकर्ते राष्ट्रवादीत व्यथा मांडणार..
21 मार्च रोजी पंढरपूर येथील श्रेयस पॅलेस येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहे. भारत नाना भालके यांच्या निधनानंतर त्यांचे सुपुत्र भगीरथ भारतीयांना विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन पद देण्यात आले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद वाढत गेला. त्यातच विठ्ठल परिवारामध्ये ही फूट पडल्याचे दिसून आली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला सोलापूर जिल्ह्यामध्ये खंबीर नेतृत्व नसल्यामुळे तालुक्यातील नेत्यांमध्ये बंडाळी वाढत गेली आहे. त्यासाठीच राज्यातील नेत्यांना थेट मध्यस्ती करावी लागणार आहे. त्यासाठीच अजित दादा व जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत घालून येणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी कामाला लावण्याची आव्हान असणार आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील पंढरपूर दौरा येण्याची शक्यता..
पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अद्यापही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नाही. भाजपानेही राष्ट्रवादीची उमेदवारीवरच आपला उमेदवार देणार असल्याचे दिसून येत आहे. यामुळे भाजपने ही वेट वॉच भूमिका घेतली आहे. मात्र भाजप कडून समाधान आवताडे, अभिजीत पाटील, नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र आमदार प्रशांत परिचारक यांनी निवडणुकी बाबत आपली भूमिका ही गुलदस्त्यात ठेवल्याचे दिसून येत आहे. यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचाही पंढरपूर दौरा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र येत्या दोन दिवसांमध्ये राष्ट्रवादी बरोबरच भाजप उमेदवारीबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा -'लॉकडाऊन हा पर्याय नाही; पण, प्रशासनाला वाटत असेल तर विरोध नाही'