पंढरपूर -करमाळा तालुक्याचा राजकीय केंद्रबिंदू असणारा आदिनाथ सहकारी साखर कारखाना, राज्य सहकारी बॅंकेने 25 वर्षांच्या करारावर आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कारखान्यास चालवण्यासाठी दिला आहे. या कारखान्यावर राज्य सहकारी बँकेचे तब्बल 128 कोटींचे कर्ज असल्याने हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी देण्याचा निर्णय बँकेने घेतला होता.
राज्य सहकारी बँकेचे आदिनाथवर 128 कोटींचे कर्ज
राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेचे आदिनाथ सहकारी कारखान्यावर 128 कोटींचे कर्ज आहे. त्यामुळे हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची प्रक्रिया बँकेकडून सुरू करण्यात आली होती. हा कारखाना बारामती ॲग्रो कारखान्यास 25 वर्षांच्या करारावर चालवण्यासाठी देण्यात आला आहे. 128 कोटींचे कर्ज असल्याने या कारखान्यावर बँकेकडून जप्तीची कारवाई करण्यात आली होती.
बारामती ॲग्रो कारखान्याच्या निविदेला मंजुरी
राज्य सहकारी बँकेने याबाबत वर्तमान पत्रात जाहिरात प्रसिद्ध करून, कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी निविदा मागवल्या होत्या. या निविदाबाबत 4 जानेवारीला निर्णय होणार होता, मात्र काही कारणांमुळे विलंब झाल्याने अखेर 12 जानेवारीला या निविदा उघडण्यात आल्या. प्राप्त निविदापैकी बारामती ॲग्रो कारखान्याची निविदा ही सर्वाधिक किंमतीची असल्यामुळे ती मंजूर करण्यात आली. हा कारखाना 25 वर्षांच्या करारावर चालवण्यासाठी बारामती ॲग्रोला देण्यात आला आहे.
आदिनाथ कारखान्यावरून राजकारण
करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर गेल्या 15 वर्षांपासून रश्मी बागल यांच्या नेतृत्वाखालील बागल गटाची एकहाती सत्ता होती. मात्र संचालकांमधील मतभेद, योग्य नियोजनाचा अभाव, संचालकांचे अंतर्गत वाद यामुळे कारखाना अडचणीत आला. हा कारखाना चालवण्यासाठी घेण्यास आमदार रोहित पवार उत्सुक असल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे करमाळ्याचे आमदार संजय शिंदे देखील हा कारखाना घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिंदे समर्थकांनी अनेकवेळा सांगितले होते. मात्र हा काऱखाना आता बारामती ॲग्रोला चालवण्यासाठी देण्यात आला आहे. बारामती ॲग्रो कडून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला भाव मिळेल अशी आशा आहे. आदिनाथ बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची ऊस घालण्यासाठी होणारी फरफट यामुळे थांबणार आहे.