पंढरपूर -पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल दोन मे रोजी होणार आहे. पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिल रोजी मतदान झाले होते. त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन मे रोजी प्रशासनाकडून कडक उपाययोजना केल्या जात आहेत. मतमोजणीच्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच निकाल ऐकण्यासाठी कोणी घराबाहेर पडू नये, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
मतमोजणी ठिकाणी गर्दी होऊ नये म्हणून उपाय योजना..
पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मतमोजणी केंद्रावर गर्दी झाल्यास परिस्थिती गंभीर होईल. त्यामुळे, पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन मे रोजी मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बंद केले जाणार आहेत.
असा असणार पोलीस बंदोबस्त..
दोन मे रोजी मंगळवेढा पंढरपुर विधानसभेच्या पोटनिवडणुकीतील पक्षांकडून व नागरिकांकडून मतदान केंद्राजवळ गर्दी होऊ नये, म्हणून जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मतदान केंद्राजवळ कोणत्याही नागरिकाला फिरता येणार नाही. मात्र तसे झाल्यास पोलिसांकडून नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्तामध्ये पाच पोलीस अधिकारी, 30 पोलीस कर्मचारी व सीआरपीएफचे पथक याठिकाणी तैनात असणार आहे.
मतमोजणी प्रवेशदरम्यान कोरोना चाचणी बंधनकारक..
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता प्रशासनाकडून कठोर उपाययोजना केल्या जात आहेत. मतमोजणी केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधी तसेच इतरांची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. ज्यांची कोरोना तपासणी केली नाही, अशा संबंधितंसाठी मतदान कक्षा बाहेरील आरोग्य कक्षात चाचणी केली जाईल. त्या तपासणीमध्ये जर अहवाल निगेटिव्ह आला तर त्यांना मतदान कक्षात प्रवेश दिला जाणार आहे.
समाधान आवताडे की भगीरथ भालके यांच्यात चुरस..
दिवंगत आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक जाहीर झाली. त्यातून भाजपकडून समाधान आवताडे तर महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांच्यात प्रमुख लढत आहे. यांच्यासह पोटनिवडणुकीत 19 उमेदवार एकूण रिंगणात आहेत. त्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, शिवसेनेचे बंडखोर नेत्या शैला गोडसे, बहुजन विकास आघाडीचे बिरप्पा मोटे, अपक्ष सिद्धेश्वर आवताडे यांनीही प्रस्थापित पक्षातील उमेदवारांसमोर मोठे आव्हान निर्माण केले आहे. मात्र खरी लढत समाधान आवताडे व भगीरथ भालके यांच्यात असणार आहे.