सोलापूर - तुम्ही जर शेतजमीन, जागा किंवा फ्लॅट खरेदी करत असाल आणि त्याची दस्त नोंदणी करायची असेल तर दस्त नोंदणीसाठी यापुढे साक्षीदाराची गरज लागणार नाही. दस्त नोंदणी करत असताना जर आधार कार्ड पुरावा म्हणून जोडले असेल, तर आधार कार्डावरूनच खरेदी करणाऱ्याची किंवा खरेदी देणाऱ्याची ओळख पटवण्यात येणार आहे. त्यामुळे बनावट खरेदीखताला आळा बसून नागरिकांचा वेळही वाचणार आहे, अशी माहिती स्टॅम्प वेंडर प्रताप सूर्यवंशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.
मालमत्तेची खरेदी आणि विक्री ही राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडे करण्यात येते. सध्या महाराष्ट्रामध्ये शेतजमीन जागा प्लॉट किंवा फ्लॅट यांची खरेदी ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते. खरेदीची दस्त नोंदणी करताना खरेदी करणारा किंवा खरेदी देणारा यांना त्यांची ओळख पटवण्यासाठी २ साक्षीदारांची गरज लागते. या २ साक्षीदारांची संपूर्ण माहिती ऑनलाइन पद्धतीने संगणकामध्ये समाविष्ट केली जाते. त्यानंतर खरेदीचा व्यवहार पूर्ण होतो. साक्षीदारांच्या संपूर्ण माहितीमुळे खरेदीच्या प्रकरणाला थोडाफार वेळ लागतो. मात्र, भविष्यकाळात खरेदीदार किंवा विक्रीदार यांना त्यांची ओळख पटवण्यासाठी साक्षीदारांची गरज भासणार नाही. कारण राज्याच्या मुद्रांक विभागाने आधारकार्डशी संयुक्त होऊन आधारकार्ड दाखवले तर नव्याने ओळख देण्याची गरज भासणार नाही, असा निर्णय घेतलेला आहे, याची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.
या योजनेसाठी आधारकार्डचे सर्वे आणि राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाचे सर्वे यांची सांगड घालून हा ऑनलाइन व्यवहार केला जाणार आहे. देशातील अनेकांकडे आधारकार्ड आहेत, आणि याची सविस्तर माहिती ऑनलाइन पद्धतीने संग्रहित झाली आहे. त्यामुळे राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाला खरेदी दस्त नोंदवत असताना संबंधित व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी २ साक्षीदारांची गरज लागत होती. ती गरज यामुळे भासणार नाही.
यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच यूआयडीएआय हे स्वतंत्र अशी सेवा उपलब्ध करून देणार आहे. आधारकार्डच्या या सेवेमुळे मुद्रांक आणि नोंदणी विभागाने वेगळी संगणक प्रणाली तयार केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातूनच भविष्यातील सर्व व्यवहार पूर्ण होणार आहेत.
बनावट खरेदी व्यवहारांना आळा बसणार -
साक्षीदारांच्या माध्यमातून बनावट खरेदीखत केले जात असल्याचे प्रकार मागील अनेक वर्षांपासून घडत आहेत. अनेक ठिकाणी वयोवृद्ध किंवा वारस नसलेल्या लोकांच्या शेतजमीनी, प्लॉट हे त्या व्यक्तीच्या परस्पर विक्री झाल्याचे प्रकार समोर येत असतात. राज्यात शेतजमीन प्लॉट, फ्लॅट यांची खरेदी ऑनलाईन पद्धतीने होत असली तरीही यामध्ये बनावट साक्षीदार, बनावट खरेदीदार आणि विक्रेता सादर करून या सर्व बनावट खरेदीचा काळाबाजार सुरू आहे. मात्र भविष्यात आधारकार्ड वरून जमिनीची खरेदी-विक्री होणार असल्यामुळे बनावट खरेदी पूर्णपणे बंद होऊन अशा प्रकारच्या गैरकृत्यांना आळा बसणार आहे. अशी माहिती सोलापुरातील स्टॅम्प वेंडर प्रताप सूर्यवंशी यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.