सोलापूर -पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे नंग्या तलवार हातात घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दहशत माजवणे, गावात भीतीचे वातावरण तयार करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर हिंदुराव पासले (वय ३०, रा. आढीव, ता. पंढरपूर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सागर पासले याला शुक्रवारी दुपारी पावणे चारच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले.
नंग्या तलवार हातात घेऊन फिरणाऱ्याला पंढरपुरात अटक गुप्तहेराकडून मिळाली पोलिसांना माहिती
सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे गावागावांमध्ये लगबग सुरू आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात शस्त्र बाळगणे हा कायद्याने गुन्हा मानला जातो. तालुक्यातील आढीव गावात सागर हातात तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरण अवचर यांना एका गुप्तहेराकडून मिळाली होती.
नंग्या तलवार हातात घेऊन फिरणाऱ्याला पंढरपुरात अटक सापळा रचून कारवाई
पंढरपूर तालुका पोलीस निरीक्षक अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो. अशोक जाधव, पो. ना. प्रकाश कोष्टी, नितीन माळी, श्रीराम ताटे यांचे एक पथक तयार केले गेले. त्या पथकाला खासगी वाहनाने आढीव गावात पाठवले. यावेळी जिल्हा परिषद शाळेसमोर रोडवर सागर हिंदुराव पासले हा एका हातात तलवार व दुसऱ्या हातात तलवारीचे कव्हर घेऊन उभा असलेला दिसला. त्यास गराडा घालून जागीच पकडण्यात आले. सागर पासले यांच्या जवळ शस्त्र जवळ बाळगण्याचा परवाना नाही. पथकाकडून त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
आरोपीविरोधात गुन्हा दाखल
सागर पासलेच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरुध्द शस्त्र अधिनियम १९५९ कलम ४,२५ सह महा पोलीस कायदा कलम १३५, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.फौ. अशोक जाधव करत आहेत.
हेही वाचा - विशेष: ह्रदयद्रावक ठरलेल्या रुग्णालयातील आगीच्या काही दुर्घटना