पंढरपूर (सोलापूर)- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील खासगी रुग्णालयांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी व अन्य रुग्णांच्या उपचारासाठी 80 टक्के खाटा राखीव ठेवाव्यात, असे आदेश प्रांताधिकारी ढोले यांनी दिले आहे. खासगी रुग्णालयांनी याचे पालन करुन रुग्णांना वैद्यकीय सेवा द्याव्यात, अशा सूचनाही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण कायद्यामधील तरतूदीनुसार खासगी रुग्णालयांनी आदेशाचे पालन करणे बंधनकारक आहे. प्रत्येक रुग्णांला उपचार मिळणे आवश्यक असून, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय व खासगी रुग्णालय मिळून समन्वयाने काम करुन, कोरानावर मात करुया, असेही प्रांतधिकारी ढोले यांनी सांगितले.
उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे म्हणाले, कोरोनाची रुग्ण संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. अन्यथा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कवडे यांनी दिला आहे.
तालुक्यात तसेच ग्रामीण भागात प्रतिबंधित केलेल्या क्षेत्रामध्ये निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्या नागरिकाला बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरील नागरिकाला तालुक्यात येता येणार नाही. याबाबत प्रतिबंधित क्षेत्रात नियम कडक राबविण्यात येत आहे. खासगी रुग्णालयांनी नागरिकांना आवश्यक आरोग्य सुविधा द्याव्यात जेणेकरुन अडचण निर्माण न होता प्रत्येक गरजू रुग्णांना तातडीने उपचार देणे सुलभ होईल, असेही डॉ. कवडे यांनी सांगितले.