सोलापूर- जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 39 वर पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात 6 रुग्णांची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. गुरुवारी आढळलेल्या 6 रुग्णांमध्ये 4 पुरुष तर 2 महिलांचा समावेश आहे.
यातील 2 रुग्ण हे बापूजी नगर झोपडपट्टी तर प्रत्येकी एक शास्त्रीनगर, लष्कर, भारतरत्न इंदिरा नगर, आणि कुर्बान हुसेन झोपडपट्टी येथील आहेत. सोलापूर शहर हद्दीत सुरु असलेली संपूर्ण संचारबंदी आता 27 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळी 8 ते दुपारी 2 या कालावधीत योग्य सोशल डिस्टन्स ठेवत केवळ किराणा, दूध, फळे, भाजीपाला गॅस सिलेंडर या खरेदीसाठी सवलत देण्यात आली आहे. ही सवलत सोलापूर शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांना मात्र लागू नाही. म्हणजे इथे कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. सोलापूर शहरातील ज्या भागात रूग्ण आढळले आहेत, त्या भागात कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हा नवीन आदेश गुरुवारी सायंकाळी प्रसिद्ध केला आहे.
या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सवलत -
अत्यावश्यक वैद्यकीय सेवा पुरवणारे खाजगी, सरकारी वैद्यकीय अधिकारी त्यांच्याशी संबंधित कर्मचारी, वाहन ॲम्ब्युलन्स सेवा, रुग्णालयातील औषध दुकाने, शासकीय अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचारी, महसूल, पोलिस, पाणीपुरवठा, विद्युतपुरवठा येथील कर्मचारी यांना या आदेशातून सवलत देण्यात आली आहे .
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या ३९ वर संचारबंदीच्या काळात रोज सकाळी 6 ते 9 या वेळेत दूध वाटप व विक्री करण्यास मुभा आहे. तर शहरातील पेट्रोल पंप या काळात रोज सकाळी 7 ते 11 या कालावधीत केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी सुरू राहतील, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. संचारबंदीचे नियम कोणीही मोडू नयेत, पोलिसांची गस्त सुरू आहे. याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातूनही नजर ठेवण्यात येत आहे. जे कोणी फिरताना सापडतील त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिला आहे. सोलापूर शहरात येणारे सोलापूर ग्रामीण हद्दीतील आंतरजिल्हा, आंतरराज्य सरहद्दीवरील 9 लहान मोठे रस्ते 3 मेच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीसाठी बंद केले आहेत.