पंढरपूर - वारकऱ्यांच्या सावळ्या विठूरायाचा आषाढी एकादशी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. प्रशासनाकडून आषाढी वारीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पंढरीत सात दिवसाची संचारबंदी आहे. आषाढी यात्रेसाठी बंदोबस्तासाठी आलेल्या सोळाशे पोलिसांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यातील चार पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण
यंदाच्या वर्षी आषाढी यात्रा सोहळा हा प्रातिनिधिक स्वरूपाचा करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे कोणताही भाविक पंढरपुरात येऊ नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. मात्र, त्याआधी जिल्हा प्रशासनाकडून बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये सोळाशे कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये चार कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. चार पैकी सोलापूर जिल्ह्यातील दोघी जण व सांगली, पुणे जिल्ह्यातील एक जण आहे. त्यांना 65 एकर परिसरातील कोरोना सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक झेंडे यांनी दिली आहे.
शहरात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त
आषाढी यात्रा एकादशी दिवशी पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करतील, त्यामुळे पंढरपूर शहरात सात दिवसाची संचारबंदी आहे. सात दिवसाच्या कालखंडामध्ये तीन हजार पोलिसांचा पंढरपुरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पोलीस अधिकारी, पोलिस कर्मचारी, राज्य राखीव दल व होमगार्ड अशा पद्धतीने पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. पंढरपुरातील प्रत्येक भागामध्ये पोलीस असणार आहेत यामध्ये वाखरी तळ, चंद्रभागा नदी पात्र, प्रदक्षिणामार्ग, विठ्ठल मंदिर परिसर अशा ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.