सोलापूर - उजनी धरणातून वाळू चोरणाऱ्या तब्बल ३८ यांत्रिक बोटींना जिलेटिनच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले. ही कारवाई जिल्ह्यातील ३ तालुक्यांनी मिळून केली आहे. पण, यात कोणालाही अटक करण्यात आली नाही. त्यामुळे वाळू चोरणाऱ्यांवर कारवाई झाली नाही.
सोलापुरात वाळू चोरी करणाऱ्या ३८ बोटी उद्ध्वस्त; गुन्हेगार मात्र मोकाट
३ तालुक्यांनी एकत्र येऊन वाळू माफियांविरोधात मोहिम उघडली. याचाच भाग म्हणून गुरुवारी ३८ बोटी जिलेटिनच्या सहाय्याने जाळण्यात आल्या.
उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरीचा प्रकार काही दिवसांपासून घडत होता. त्यामुळे इंदापूर, दौंड आणि करमाळा या ३ तालुक्यांनी एकत्र येऊन वाळू माफियांविरोधात मोहिम उघडली. याचाच भाग म्हणून गुरुवारी ३८ बोटी जिलेटिनच्या सहाय्याने जाळण्यात आल्या.
तीन तालुक्याच्या संयुक्त पथकाने कारवाई करूनही गुन्हेगार सापडत नाहीत. यामुळे शंका-कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. कारवाई करत असताना वाळू माफिया पळून गेले असे सांगण्यात येत आहे. पण, बोटी सापडू शकतात तर गुन्हेगार कसे निसटू शकतात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या मोठ्या कारवाईवर संशयाचे धुके पसरले आहे.