सोलापूर- चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना धुराचा त्रास होऊ नये यासाठी केद्र सरकारने 'उज्ज्वला गॅस योजना सुरू केली. या योजनेंतर्गत सोलापूर शहरातील महिलांना मोफत 'गॅस कनेक्शन किट'चे वाटप करण्यात आले. राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. दक्षिण सोलापूर मतदारसंघातील, प्रभाग १९ मधील आकाशवाणी केंद्र, नीलमनगर परिसरातील १०० महिलांनी याचा लाभ घेतला.
यावेळी नगरसेविका अनिता कोंडी, नगरसेविक श्रीनिवास करली, श्रीनिवास पुरुड, डॉ. शिवराज सरतापे, भाजप पदाधिकारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
भाजप सरकार गरीब आणि सामान्य कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले. सामान्यांना आजारांवर उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत मिळण्यासाठी 'आयुष्यमान भारत' योजना चालू केली आहे, गरजूंनी त्याचा लाभ घ्यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प आहे. त्यामुळे, प्रत्येकाला हक्काचे घर मिळण्यासाठी प्रयत्न करणार असून येत्या काळात गृहनिर्माण संस्थांची उभारणी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
कचरा व्यवस्थापन, एलईडी, उर्वरित रस्ते या मूलभूत सुविधा देखील पुढच्या टप्प्यात दिल्या जातील. असे सांगत, ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांनी मतदार नोंदणी करुन घेण्याचे तसेच भाजपाचे सदस्य होण्याचे देखील सुभाष देशमुख यांनी सर्वांना आवाहन केले.