महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंधुदुर्गात रानकुत्र्यांची दहशत, १३ जणांना केले जखमी - रानटी कुत्र्यांचा हल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथे रानकुत्र्यांची दहशत पसरली आहे. या कुत्र्यांनी १३ जणांना जखमी केले आहे.

सिधुदुर्ग
सिधुदुर्ग

By

Published : Apr 23, 2021, 7:26 PM IST

सिंधुदुर्ग -सावंतवाडी तालुक्यातील गेळे व आंबोली येथील वस्तीत रानकुत्रा घुसून तब्बल 13 जणांना जखमी केल्याची घटना घडली आहे. जखमींमध्ये पुरुष महिला व लहान मुलांचाही समावेश आहे. या सर्वांना उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अचानक वन्य प्राण्यांकडून झालेल्या हल्ल्याने आंबोली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून नागरिकांनी वर्णन केल्यानुसार तो प्राणी रानकुत्रा असल्याचा खात्रीशीर अंदाज व्यक्त केला आहे.

पाचजण गंभीर जखमी -

सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथे गुरुवारी रात्री गेळे जंगलमय भागातून रानकुत्रा गेळे आंबोलीतील वस्तीत घुसला. शुक्रवारी सकाळी 7 नंतर तो सतीचीवाडी येथून कामतवाडी, फौजदारवाडी, गावठाणवाडी, जाधववाडी येथील वस्तीत घुसला. त्याने लहान मुलांसह महिला व इतर नागरिकांवर हल्ला करुन जखमी केले. या हल्ल्यात तब्बल 13 जण जखमी असून 3 लहान मुलांचा समावेश आहे. एकूण जखमींपैकी चार ते पाचजण गंभीर जखमी आहेत.

नागरिकांनी वर्णन केल्यानुसार तो रानकुत्रा असल्याचा अंदाज -

घटनेची माहिती मिळताच आंबोली परिसरात वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांच्यासह वनमजुर बाळा गावडे, वनरक्षक बाळासाहेब ढेकरे, हेमंत बागुल, प्रताप कोळी, गाडेकर अशी वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली. बघितलेल्या नागरिकांकडून आधी बिबट्या असल्याचा समज झाला होता. मात्र, खात्री झाल्यानंतर तो रानकुत्रा असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत वनक्षेत्रपाल दिगंबर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले, वनविभागाने अद्यापही तो प्राणी पाहिला नाही. मात्र, नागरिकांनी वर्णन केल्यानुसार तो रानकुत्रा असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्याला पकडण्यासाठी टीम घटनास्थळी हजर झाली आहे.

गंभीर जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू -

इतर नागरिकांना धोका निर्माण होऊ नये तसेच वनविभागाच्या मदतीसाठी कर्मचाऱ्यांसह नागरिकही हातात काठ्या घेऊन प्राणी वस्तीत पुन्हा येतो का हे पाहण्यासाठी लक्ष ठेवून आहेत. हल्ल्यात जखमींना सुरुवातीस आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर अधिक उपचारासाठी काहींना येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गंभीर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details