सिंधुदुर्ग- सलग पाचव्या दिवशीही तळकोकणाला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले. या ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात सिंधुदुर्गमध्ये 92.60 मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या 48 तासात तळकोकणाला मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
48 तासात तळकोकणात मुसळधार पावसामुळे होडवडे-तळवडे आणि कुडाळमधील आंबेरी पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प होती. तर निर्मला नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. त्यामुळे माणगाव आंबेरी पूलावरून पाणी जाण्याचे सत्र सुरूच आहे. परिणामी 27 गावांचा संपर्क तुटला आहे. तर जिल्ह्यातील इतर काही अंतर्गत राज्यमार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.
मुसळधार पावसाने अनेक झाडे कोसळली सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. यामध्ये तिलारी, तेरेखोल, कर्ली, गडनदी, सुक नदी आणि आचरा आदी नद्यांचा समावेश आहे. तर छोट्या नद्या आणि नाले देखील दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे देवगडसह इतर तालुक्यात पडझडीमुळे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे मुसळधार पावसामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी मोबाईल सेवा बंद पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुसळधार पावसाने अनेक झाडे कोसळली धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने अनेक धरणांमधून विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पुढील 48 तासात तळकोकणात अति-मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.