सिंधुदुर्ग - दोडामार्ग तालुक्यात वन्य हत्तींची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दोडामार्ग वनक्षेत्रपालांना घेराव घातला. यावेळी नुकसान भरपाई मिळावी तसेच हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली.
सिंधुदुर्गमधील दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा धुमाकूळ; संतप्त नागरिकांचा वनविभागाला घेराव
दोडामार्ग तालुक्यातील केर, भेकुर्ली, मोर्ले गावात हत्ती समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात मोर्चा काढून वनक्षेत्रपालांना घेराव घातला. यावेळी नुकसान भरपाई मिळावी तसेच हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली.
दोडामार्गातील केर, भेकुर्ली, मोर्ले गावात हत्तींमुळे नुकसानीचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत आहे. हत्तींच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत धरून शेती करण्याची वेळ आली आहे. नदीवर, शेतात एवढेच नाही तर चक्क रस्त्यावर एसटीसमोर आणि घराशेजारी दिवसाढवळ्या हत्तींचे दर्शन घडत आहे. तिलारी वनक्षेत्रातील या हत्तींचे मानवी वस्तीकडे आगमन झाल्याने शेतकरी मात्र चिंताग्रस्त झाला आहे. येथील ग्रामस्थदेखील हत्तींच्या दहशतीखाली जगत आहेत. अकार्यक्षम वनविभागाला कंटाळून सोमवारी या गावातील ग्रामस्थांनी दोडामार्ग वनविभाग कार्यालयात मोर्चा काढला.
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या व्यथा अधिकाऱ्यांपुढे मांडत त्यांना घेराव घातला. तसेच आपल्या तक्रारींचे निवेदन दिले. बांबर्डे, विजघर, खराडी, हेवाळे येथे धुमाकूळ घालत असलेले हत्ती घोटगेवाडीतुन मोर्ले, केर, भेकुर्ली या गावात वावर करत आहेत. यात एक टस्कर हत्ती तसेच त्यांचे दोन कळप असून एकूण ८ ते १० हत्ती या गावात वावर करत असल्याचा अंदाज गावकऱ्यांनी वर्तवला आहे.