महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'UGC च्या गाईडलाईननंतरच ठरणार विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन.. ' - उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

युजीसीच्या मार्गदर्शन सुचनांनंतर परीक्षांचे वेळापत्रक तयार करावे असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्यातील कुलगुरुंना केले. त्याचबरोबर विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याविषयी युजीसीचे मार्गदर्शन आल्यानंतरच निर्णय घ्यावा, अशा सूचनासामंत यांनी दिल्या.

Higher and Technical Education Minister Uday Samant
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

By

Published : Apr 25, 2020, 11:05 AM IST

सिंधुदुर्ग - विद्यापीठांच्या परीक्षा ऑनलाईन घ्यायच्या की ऑफलाईन याविषयी युजीसीचे मार्गदर्शन आल्यानंतरच निर्णय घ्यावा अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या. सामंत यांनी आज व्हिडिओ कॉन्फर्न्सच्या माध्यमातून राज्यातील सर्व अकृषि विद्यापीठाच्या कुलुगुरूंशी चर्चा केली. यावेळी शिक्षण संचिव सौरभ विजय यांच्या सह उच्च शिक्षण संचालक व सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

युजीसीच्या मार्गदर्शन सुचनांनंतर परीक्षांचे वेळापत्रक तयार करावे असे सांगून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले की, ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबत सर्वांना विचारात घेऊनच निर्णय घ्यावा लागेल. तसेच सध्या विद्यार्थ्यांमध्ये ऑनलाईन व ऑफलाईन परिक्षांविषयी संभ्रमावस्था आहे. ती दूर करण्याच्या दृष्टीने सर्व कुलगुरूंनी आपल्या स्तरावर युजीसीच्या मार्गदर्शक सुचनांनंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायच्या, याविषयी प्रसिद्दी करावी. या मार्गदर्शक सुचनांसोबतच सध्या राज्यस्तरीय समितीने तयार केलेला आराखडा यांची योग्य ती सांगड घालून परीक्षांचे वेळापत्रक व पुढील शैक्षणिक वर्षाचे नियोजन करावे. ऑनलाईन परीक्षा घेण्याविषयी काही अडचणी असल्यामुळे शक्यतो ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या दृष्टीने विद्यापीठांनी तयारी करावी. परीक्षा जरी ऑनलाईन होणार नसल्या तरी ऑनलाईन टिचिंगची सर्व तयारी विद्यापीठांनी त्यांच्या स्तरावर करावी. यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना चांगल्या शैक्षणिक सुविधा पुरवता येतील.

ऑनलाईन परीक्षा नाही तर ऑनलाईन शिक्षणाविषयी आपल्याला निर्णय घ्यावयाचा आहे. ज्या विद्यापीठांचा अभ्यासक्रम 70 टक्के पेक्षा जास्त पूर्ण झाला आहे. त्यांनी परीक्षांसाठी पूर्ण झालेल्या अभ्यासक्रमाचा समावेश करावा व उर्वरीत अभ्यासक्रम पुढील परीक्षेमध्ये समाविष्ट करावा. मुंबई आणि पुण्याच्या परिस्थितीवर राज्यातील परीक्षांचा विचार करता येणार नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्याकडील परिस्थितीनुसार निर्णय घ्यावेत अशा सूचना सामंत यांनी यावेळी दिल्या.

विद्यापीठांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक मदत करावी

सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठांनी भरीव आर्थिक सहाय्य करून राज्य सरकारचे हात मजबूत करावेत, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सर्व अकृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंना केली. सदरची मदत ही विद्यापीठांकडे असलेल्या आपत्कालिन निधीमधून करावी, अशी सूचना ही त्यांनी केली. याविषयी पुण्याचे एस.एन.डी.टी व कोल्हापूरचे शिवाजी विद्यापीठ यांनी एक कोटी पेक्षा जास्त मदत करण्यास मान्यता दर्शवली आहे. तसेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस केलेल्या 10 कोटी रुपयांच्या आर्थिक सहाय्याबद्दल त्यांचे आभार मानले व आभिनंदनही केले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी यावेळी आपत्कालिन निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याविषयी परवानगीचे नियमावली तपासावी अशा सूचना केल्या. तसेच युजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनंतर परीक्षांविषयी निर्णय घेताना लॉकडाऊन ज्या जिल्ह्यांमध्ये उठेल तिथे परीक्षा घेणे कशा पद्धतीने शक्य आहे याचा अहवाल करावा, जीवन रक्षक कोर्स तयार करावा, जेणे करून आपतकालीन परिस्थितीमध्ये या कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांचा उपयोग समाजास होईल. विद्यापीठांमध्ये तपासणी लॅब तयार करण्याविषयी कार्यवाही करावी.

लॉकडाऊनचा काळ हा वार्षिक सुट्ट्यांमध्ये धरावा -

लॉकडाऊनचा काळ हा वार्षिक सुट्ट्यांमध्ये धरावा व याविषयी प्रत्येक विद्यापीठाने एकवाक्यता ठेवावी. ऑनलाईन शिक्षणासाठी चांगल्या पद्धतीने करण्याविषयी कार्यवाही करावी अशा सूचना सामंत यांनी केले. यावेळी सर्व कुलगुरूंनी ऑनलाईन व ऑफलाईन परीक्षा, शैक्षणिक वर्ष, अभ्यासक्रम याविषयी त्यांचे मत मांडले. तसेच ऑनलाईन परीक्षा घ्यावयाच्या झाल्यास सर्व विद्यार्थ्यांना सुविधा पुरवता येतील का याविषयीही भूमिका स्पष्ट केली. शेवटी राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांनी सर्व विद्यापीठांनी त्यांची तयारी करावी व त्याचा आहवाल सचिवांकडे सादर करावा, त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ असे सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details