सिंधुदुर्ग- देवगड बंदरातील बोटींवर खलाशांना एका गूढ आजाराने ग्रासले असून मंगळवारी आणखी एका खलाशाचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. या आजारामुळे तीन खलाशांचा मृत्यू झाला आहे. अजूनही आरोग्य विभागाला या रोगाचे निदान करता आलेले नाही. बाबानो पन्दान नेती (30, रा, ओडिशा) असे मृत झालेल्या खलाशाचे नाव आहे. देवगड येथील पल्लवी प्रवीण कांदळगावकर यांच्या ‘पल्लवी’ या बोटीवर हा खलाशी कामाला होता.
सिंधुदुर्गमध्ये खलाशांना गूढ आजाराने 16 खलाशांना ग्रासले; आतापर्यंत 3 खलाशांचा मृत्यू - देवगड बंदर
देवगड बंदरातील सुमारे 16 खलाशांना एका गूढ रोगाची लागण झाली आहे. यामध्ये खलाशांचे ढोपराच्या खाली पायांना सूज येऊन त्यांना उभे राहता येत नाही. या आजाराचे सात खलाशी ओरोस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सुरुवातीला दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
कांदळगावकर यांच्या बोटीवर असताना या खलाशाची सोमवारी प्रकृती गंभीर झाल्याने त्याला उपचारासाठी देवगड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, प्रकृती खूपच गंभीर असल्याने त्याला तातडीने ओरोस येथे उपचारासाठी नेण्यात आले. ओरोस येथे उपचार सुरू असताना मंगळवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. लॉकडाऊनमुळे मृतदेह त्यांच्या गावी पाठविणे शक्य नसल्याने देवगड येथेच त्याच्यावर अंत्यसंसकार करण्यात आले.
कोल्हापूरात दाखल करण्यात आलेल्या 5 जणांची प्रकृती ठीक
कोल्हापूर येथे उपचारासाठी पाठविलेल्या गंभीर आजारी असणाऱ्या 5 खलाशांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज देण्यात येणार आहे. देवगड बंदरातील सुमारे 16 खलाशांना एका गूढ रोगाची लागण झाली आहे. यामध्ये खलाशांचे ढोपराच्या खाली पायांना सूज येऊन त्यांना उभे राहता येत नाही. या आजाराचे सात खलाशी ओरोस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी सुरुवातीला दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर उर्वरित पाच खलाशांना ओरोसहून कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कोल्हापूर सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे तेथून कोल्हापूर येथील अॅस्टर आधार या खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे.
दरम्यान कोल्हापूर सीपीआर रुग्णालयातून या खलाशांवर खासगी रुग्णालयात उपचार केल्यामुळे सुमारे लाखो रुपयांचा उपचाराचा खर्च बोटीच्या मालकांना सोसावा लागणार आहे. खलाशांना खासगी रुग्णालयात उपचाराचा निर्णय कोल्हापूर सीपीआरने बोट मालकांशी कोणतीही चर्चा न करता घेतल्याने बोटमालक अडचणीत आले आहेत. देवगड बंदरातील खलाशांच्या या विशिष्ट आजाराचा आरोग्य विभागाच्यावतीने सर्व्हे करण्यात आला. यामध्ये सुमारे 810 खलाशांची तपासणी केली त्यातील 16 खलाशांना हा आजार झाला आहे.